मुंबई- लालबाग राजाच्या दर्शनासाठी गुजरातवरून निघालेल्या एका वाहनाचा मुंबई अहमदाबाद महामार्गवर भीषण अपघात झाला. या अपघातात एक वाहनातील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर ५ तरुणी गंभीर जखमी झाल्या. रस्त्यात बंद पडलेल्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला.
मुंबईच्या लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रसिध्द आहे. राष्ट्रीय नेत्यांपासून सेलिब्रेटींची गर्दी होत असते. त्यामुळे या मंडळाची प्रसिध्दी वाढत आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. मुंबईसह गुजरातमधील भाविकही मोठया संख्येने येत असतात. गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यातील ७ तरुणांनी लालबाग राजाच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले. बुधवारी सकाळी ते वडोदरा येथून खासगी वाहनाने निघाले होते. चिराग पटेल (३२) हा गाडी चालवत होता तर त्याचा मित्र हितेनभाई पटेल (३२) हा शेजारी बसला होता मागच्या आसनावर त्यांच्या ५ मैत्रीणी बसल्या होत्या. मात्र दर्शनापूर्वीच त्यांच्या वाहनाचा विचित्र अपघात घडला.
असा घडला अपघात
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील फाऊंटन हॉटेल समोर एका ट्रकचा ( एमएच ०३ सीवी ६२६८) अपघात झाला होता. ट्रक चालक सूर्यबली तिवारी (५८) याने अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा न करता तिसऱ्या मार्गिकेत आडवा उभी केला होता. त्याने पार्किंट लाईट तसेच इंडिकेटर सिग्नलही दिला नव्हता. दरम्यान, गुजरातवरून निघालेल्या तरुणांचे वाहन सायंकाळी ७ च्या सुमारास फाऊंटन हॉटेलजवळ पोहोचले. तेथे नेमका अपघातग्रस्त ट्रक रस्त्यात उभा होता. भरधाव वेगात असलेल्या चालकाला हा ट्रक दिसला नाही. जेव्हा गाडी जवळ आली तेव्हा त्याने ब्रेक मारला. मात्र तोपर्यंत त्यांची गाडी ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात चालकाशेजारी बसलेला हितेशभाई पटेल (३२) याचा मृत्यू झाला. चालक चिराग पटेल (३०) याने पटकन दार उघडून उडी मारल्याने तो वाचला. गाडीच्या मागील आसनावर बसेलल्या निराली शर्मा (२७), दामिनी प्रजापती (२८), जैवीनी राणा (२५), मेघा शालेकर (२८) आणि अंतिमा शर्मा (२५) या जखमी झाल्या. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले.
ट्रकचालकावर गुन्हा दाखल
अपघातग्रस्त ट्रक चालकालाने ट्रक निष्काळीपणे रस्त्यात चुकीच्या पध्दतीने उभी केला होता. काळोख होता तरी त्याने पाक्रिंग सिग्नल दिलेला नव्हता. त्यामुळे मागून येणार्या गाडीने ट्रकला धडक दिली, असे पोलीस उपनिरीक्षक करोडीवाल यांनी सांगितले. नायगाव पोलिसांनी चालकाविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), २८१, २८५, १२५ (अ) आणि १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.