मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दरडीप्रवण भागात राहाणाऱ्या लोकांची झोप उडवली आहे. विक्रोळी येथे जयकल्याण सोसायटीजवळ झालेल्या भूस्खलनात एका एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले. या घटनेनंतर मुंबईतील डोंगरी भागात तसेच दरडप्रवण भागात राहाणाऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशी कोणतीही घटना घडल्यास महापालिका युद्धपातळीवर मदतीसाठी सज्ज असल्याचे मुंबई महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांनी सांगितले. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या अतिधोकादायक ठिकाणांमधील काही जागी यापूर्वीच संरक्षक भींती बांधण्याचे काम करण्यात आले असल्याचेही आयुक्त गगराणी यांनी सांगितले. एकूणच पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून कोणत्याही दुर्घटनेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

भूस्खलन तसेच दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांचे यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले असून मुंबईत आजघडीला उपनगरात कुर्ला, भांडूप, घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड अशा एकूण २४९ दरडीप्रवण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यातील ७४ जागा धोकादायक तर ४६ अत्यंत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यातील काहीच जागा शहरी भागात असून उपनगरांमध्ये जास्त ठिकाण असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न निर्माण होत असतो. महापालिकेच्या माध्यमातून यावर वेगवेगळ्या उपाययोजनाही राबविण्यात येत असतात. मात्र दगडीग्रस्त डोंगराळ भागात अधिकाधीक अनधिकृत झोपड्या तसेच वाढीव बांधकाम होत असल्यामुळे या दरडीग्रस्त भागात पावसाळ्यात निर्माण होणारा धोकाही दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.यातील अतिदोकादायक ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे कामही पालिकेकडून हाती घेण्यात आले असले तरी यातील बहुतेक ठिकाणे ही जिल्हाधिकारी व म्हाडाच्या जागेवर आहेत.

भूसख्खलन तसेच दरडी कोसळण्याची ठिकाणे निश्चित करून या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबात आयाआयटी कडून सल्लाही घेण्यात आला आहे. तसेच त्यादृष्टीने अंमलबजावणीही पालिकेकडून करण्यात येत असते. तथापि राजकीय हस्तक्षेपातून या ठिकाणी वाढणाऱ्या झोपड्या व बांधकामाला आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आजघडीला पालिकेपुढे निर्माण झाला आहे. दरडी कोसळून मोठी दुर्घटना झाली की राजकीय पक्षांचे नेते व मंत्री येतात. मदतीची घोषणा होते. काही लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना दिले जातात मात्र कायमस्वरुपी उपाययोजनेच्या दृष्टीने सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाही.

 महापालिका कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज

यंदा पालिकेने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने ४६ अतिधोकादायक ठिकाणांपैकी ३० ठिकाणी संरक्षक भींती तसेच आवश्यक ते बांधकामे हाती घेतली होती. या दरडप्रवण भागात दुर्घटना घडू नये व घडल्यास काय उपाययोजना केल्या याबाबत पालिका आयुक्त भुषण गगराणी यांना विचारले असता, पावसाळापूर्व महापालिकेच्या पथकांनी या सर्व ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या माध्यमातून दरड कोसळल्यास नेमके काय करायचे याबाबतचे अनेक प्रशिक्षण उपक्रम संबंधित ठिकाणी राबविण्यात आले असून हे काम सातत्याने सुरु असल्याचे आयुक्तांनी सांगितले. २०१७ साली पालिकेने मुंबईतील दोकादायक ठिकाणांचे जिऑलॉजीकल सर्वेक्षण केले होते. त्या आधारे गेल्या काही वर्षात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तसेच दुर्घटना झाल्यास संबंधित लोकांचे तात्काळ स्थलांतर करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी वॉर्डनिहाय १२० शाळांमध्ये व्यवस्थ करण्यात आली असून अतिदोकादायक ठिकाणांचा विचार करून एनडीआरफची दोन पथके सज्ज ठेवण्यात आल्याचेही आयुक्त गगराणी यांनी सांगितले. आमच्या सर्व संबंधित अधकाऱ्यांना यासाठी आवश्यक सूचना व योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांच्या विशेष टीमही तयार करण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले. एकूणच पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून कोणत्याही दुर्घटनेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.