मुंबई : पश्चिम उपनगरांतील नागरिकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रूग्णालयात रक्तचाचणीकरीता अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अद्ययावत आणि अधिक क्षमता असलेल्या रक्तातील बायोकेमिस्ट्री विश्लेषण करणाऱ्या स्वयंचलित संयंत्राचा लोकार्पण सोहळा कूपर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
रक्तातील बायोकेमिस्ट्री विश्लेषण करणाऱ्या स्वयंचलित संयंत्रासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत सामाजिक बांधिलकी (सी.एस.आर.) अंतर्गत अर्थसहाय्य पुरविण्यात आले. चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन संस्थेने हा प्रकल्प कार्यान्वित केला. एकाच वेळी अनेक प्रकारचे रक्ताचे नमुने जलद गतीने विश्लेषण करण्याची या संयंत्राची क्षमता आहे. शिवाय रोगनिदान रक्त चाचणीची माहिती संयंत्रामध्ये साठवता येणे शक्य आहे. परिणामी, डॉक्टरांना वैद्यकीय परीक्षण आणि योग्य निदान व उपचार करण्यासाठी हे संयंत्र उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे रूग्णांना अचूकरित्या उपचार देणे शक्य होईल, अशी माहिती बायोकेमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी माने यांनी दिली. संयंत्राच्या लोकार्पण कार्यक्रमास इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रतिनिधी संजीव रंजन, विजय तावडे आणि चाईल्ड हेल्थ फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक जिजी जॉन, अब्दुल बेग आदी मान्यवरांसह रूग्णालयाच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
दिवसाला पाच हजार रक्तचाचण्या होणार
रक्तचाचणी प्रयोगशाळेत प्रतिदिन ४ हजार ५०० ते ५ हजार इतक्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी होते. तर वर्षाला १२ लाखांहून अधिक रक्त चाचणी नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात येतात. रूग्णालयात रक्तचाचणीसाठी दैनंदिन उपलब्ध होणाऱ्या रक्ताच्या नमुन्यांपेक्षा अधिक संख्येने रक्तचाचणीचे नमुने तपासणे या संयंत्रामुळे शक्य होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये रक्तचाचणीच्या माध्यमातून निदान हा आरोग्य सेवांमधील एक महत्त्वाचा भाग आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने हे एक महतचे पाऊल आहे.- डॉ. सुधीर मेढेकर, अधिष्ठाता, कूपर रूग्णालय