मुंबई : गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या कामकाजाच्या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे वादग्रस्त ठरलेले चित्रीकरण कोणी केले असावे याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने सुरू केली आहे.कोकाटे हे सभागृहाचे कामकाज सुरू असताा दुपारी १.३१ ते १.५१ या काळात भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणली आहे. यावरून कोकाटे हे वादग्रस्त ठरले आहेत. ही चित्रफीत कोणी तयार केली याचीच साऱ्यांना उत्सुकता आहे. सत्ताधारी बाकांवरील कोणी तरी त्याचे चित्रीकरण केले असण्याची शक्यता वर्तविली जाते.
विधिमंडळ सचिवालयाच्या वतीने हे चित्रीकरण कोणी केले असावे याची चौकशी सुरू झाली. अधिकाऱ्यांनी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांचे भाषण सुरू असतानाच्या कालावधीतील साऱ्या कामकाजाच्या चित्रीकरणाची पाहणी केली. तेव्हा सभागृहातील कोणी भ्रमणध्वनीतून चित्रीकरण करीत असल्याचे आढळले नाही, असे सूत्राने सांगितले. यामुळे आता प्रेक्षक गॅलरीतून कोणी चित्रीकरण केले का, याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सभापती राम शिंदे यांना अहवाल सादर केला जाईल.
अजित पवारांची भूमिका निर्णायक
विधान परिषद सभागृह सुरू असताना भ्रमणध्वनीत रमी खेळत असल्याच्या चित्रीफिती समोर आल्याने कोकाटे हे वादग्रस्त ठरले असतानाच त्यांनी ‘भिकारी शासन’ अशा शब्दांत सरकारला शेलक्या दिल्याने त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. रमी खेळणे आणि सरकारचा भिकारी म्हणनू उल्लेख करणे या दोन्हींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. यामुळेच कोकाटे यांची गच्छंती होणार की त्यांना अभय मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका या संदर्भात निर्णायक ठरणार आहे. कोकाटे यांच्याकडील कृषि खाते काढून घेतले जाण्याची शक्यता वर्तविली जाते.