मुंबई : कर्जत तालुक्यात मंगळवारी एका विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळला. दरम्यान, मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढणे वनविभागासाठी जिकिरीचे होते. त्यामुळे वनविभागाने तातडीने आऊल्स आणि यशवंती हायकर्स या संघटनांशी संपर्क साधला. कर्जत तालुक्यातील आंबिवली पेठ येथे मंगळवारी बिबट्या मृतावस्थेत आढळला होता.

मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर कसे काढावे हा पेच निर्माण झाला होता. वन विभागाने आऊल्स आणि यशवंती हायकर्स या संघटनांशी संपर्क साधला. अर्ध्या तासातच दोन्ही संघटनेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. संघटनेचे सदस्य अवघड चढाई पार करत विहिरीपर्यंत पोहोचले. संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन केवळ ५ मिनिटांत विहिरीतून मृत बिबट्याला बाहेर काढण्यात आले.

आऊल्स संस्थेविषयी

ऑर्गनायझेशन फॉर वाईल्डलाईफ लर्निंग अ‍ॅंड सस्टेनेबलिटी (आऊल्स) ही पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असेलली संस्था आहे. ही संस्था प्रामुख्याने नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याचे आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे काम करते. ही संस्था विविध शाळा, महाविद्यालये, गावांमध्ये कार्यशाळा, शिबिरे व जनजागृती मोहिम राबवते.

यशवंती हायकर्स, खोपोली

यशवंती हायकर्स ही गिर्यारोहण संस्था आहे. सह्याद्रीतील गिर्यारोहणाबरोबरच या संस्थेने अनेकवेळा नैसर्गिक आपत्तींमध्ये, अपघातांमध्ये किंवा वन्यप्राणी वाचवण्याच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. तांत्रिक चढाई, दोरखंड वापरून मदतकार्य हे यांचे वैशिष्ट्य असून त्यांनी अनेक वेळा वनविभागासोबत काही कठीण मोहिमांमध्ये काम केले आहे.