एखाद्या शहराचा नूर आणि सूर दोन्ही शब्दांत पकडणं, त्याच सहजतेने तो दृश्यचौकटीतून जिवंत करत प्रेक्षकांना एक अनोखी अनुभूती देणं हे येरागबाळ्याचं काम नाही. २००७ साली अनुराग बासू यांनी पहिल्यांदा मुंबई – दिल्लीसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांचा आलेख, इथल्या माणसांचं भावविश्व, त्यांचे नातेसंबंध या सगळ्यांचा वेध घेत ‘लाइफ इन मेट्रो’ या चित्रपटाच्या रूपाने पडद्यावर जिवंत केला होता. त्या वेळी वेगाने बदलत गेलेल्या या शहरांचा वास्तव चेहरा पाहताना नाही म्हटलं तरी हबकायला झालं होतं. मधल्या १८ वर्षांमध्ये भावनिक, आर्थिक, सामाजिक हरएक स्थित्यंतरातून ढवळून निघालेली ही शहरं आणि त्यांना आपलंसं करणारी माणसं काहीअंशी स्थिरावलेली वाटतात. किमान स्वत:च्या मनाचं ऐकावं आणि फसायला झालंच तर परिणामांची जाणीव ठेवून धीरानं वाटचाल करत राहावी इतकं भान आलं आहे बहुधा… अनुराग बासूंचाच ‘मेट्रो इन दिनों’ पाहताना थोडंफार का होईना आश्वस्त वाटतं.
‘लाइफ इन मेट्रो’ आला तेव्हा मुंबई – दिल्लीसारख्या शहरांमध्ये कॉल सेंटर्सचं पेव फुटलं होतं. प्रत्येकाच्या हातात संवादासाठीचं मोबाइल नामक नवं माध्यम खेळू लागलं होतं. अर्थात, त्याचा वापर प्रामुख्याने संवादासाठीच होत होता. बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आली. घर, कुटुंब यासाठी झगडणारी माणसं मनाने मात्र दूर जात होती. लोकांना दाखवायला सुखाने नांदणारं घर, उत्तम पत्नी – मुलं… पण प्रत्यक्षात एकाच घरात राहूनही एकमेकांशी संवाद साधण्याचीही इच्छाशक्ती न उरलेली मंडळी घराबाहेर सगळी सुखं शोधत होती. हे चित्र आता पूर्णपणे बदललं आहे का? घराघरातील विसंवादाचं हे चित्र बदललेलं नाही, मात्र त्याचे आयाम आणखीनच वेगळे आहेत. एकीकडे परिपूर्ण कुटुंब असावं, आपल्याला समजून घेणारा जोडीदार मिळावा, चांगली नोकरी असावी, सन्मान असावा या अपेक्षा बदललेल्या नाहीत. मात्र, आता प्रत्येक गोष्ट निरखून पाहायला हवी, यापेक्षा अधिक चांगलं मिळेल थोडी वाट पाहू… थोडा शोध घेत राहू… यात गोंधळलेपण अधिक वाढत चाललं आहे. नोकरी, जोडीदार, घर, खाणं सगळ्याचेच अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आता यातलं नेमकं काय घ्यायचं? हे निवडलं आणि त्याचा उलट परिणाम झाला तर… नको दुसरा पर्याय बरा… यात काहीच निर्णय घेता येत नाही. तरुण पिढीची ही गोंधळलेली अवस्था, आयुष्याच्या सांजपर्वाला पोहोचलेल्यांना आपल्याला नेमकं काय हवं आहे हे आतापर्यंत अनुभवलेल्या उन्हाळा-पावसाळ्यांमधून उमगलेलं असतं. त्यामुळे काहीशा ठामपणे आयुष्याची वाटचाल करण्याचा त्यांचा दृष्टिकोन ते अजून माध्यमिक शिक्षणाचा टप्पाही पार न केलेल्या कुमारवयीनांना आपल्या लैंगिक भावनाचं सुकाणू नेमकं कुठल्या बाजूला वळतं आहे? समलिंगी की भिन्नलिंगी हे शोधण्याची झालेली घाई इतका सगळा भावनांचा पसारा अनुराग बासू यांनी ‘मेट्रो इन दिनों’मध्ये मांडला आहे.
‘लाइफ इन मेट्रो’चा सिक्वेल वगैरे काढायचा, असा काही विचार अनुराग यांनी तेव्हा केला नव्हता. मात्र, त्याचा सिक्वेल होऊ शकतो ही कल्पना त्यांच्या डोक्यात अभिनेता इरफान खान यांनी घुसवली होती. इरफान यांनी माँटी हे गमतीशीर पात्र ‘लाइफ इन मेट्रो’मध्ये रंगवलं होतं. त्यांची आठवण ‘मेट्रो इन दिनों’मध्येही अनुराग यांनी जपली आहे. जवळपास दोन दशकांचं अंतर या चित्रपटांमध्ये आहे. आणि तरीही शहरांच्या स्वभावानुसार स्वत:ला त्या साच्यात ढाळणाऱ्या माणसांची कथा तितक्याच ताकदीने मांडणं, संगीतकार प्रीतम यांचं तितकंच श्रवणीय संगीत, त्याच पद्धतीने गोष्टीतल्या पात्रांच्या मध्ये मध्ये येत गाण्यांच्या माध्यमातून त्यांची साद प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं अशा कैक गोष्टींचा धागा याही चित्रपटाशी जोडून घेत नवी गोष्ट रंगवणं ही कमाल अनुराग बासूच करू जाणे… हा चित्रपट पूर्णपणे स्वतंत्र कलाकृती आहे. हा पाहण्यासाठी आधीचा चित्रपट पाहणं गरजेचं नाही, पण तो पाहिला तर ‘मेट्रो इन दिनों’ पाहताना अधिक गंमत येते हेही तितकंच खरं…
चार प्रमुख जोड्यांची कथा यात आहे. शिवानी (नीना गुप्ता) आणि तिच्या दोन मुली काजोल (कोंकणा सेन शर्मा), चुमकी (सारा अली खान) हा यातल्या बऱ्यापैकी बहुतेक पात्रांना जोडणारा धागा. काजोल आणि तिचा पती माँटी (पंकज त्रिपाठी) या दोघांची कथा ही मध्यमवयीन नवरा-बायकोची काहीशी आपल्या परिचयाची गोष्ट. वयाच्या एका टप्प्यावर आपल्या जोडीदाराकडून सुख मिळत नाही म्हणून डेटिंग अॅपचा सहारा घेत संवादसुखाचे नवे मार्ग शोधणारा पुरुष आणि त्याच्या खोड्यांची चाहूल लागल्यावर आधी चिडणारी, मग परिस्थिती आपल्या हातात घेऊन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणारी बायको… अशी यांची गोष्ट मस्त रंजक झाली आहे. आदर्श नोकरी, आदर्श जोडीदार सगळं निवडून आदर्श संसाराचं स्वप्न बाळगणारी आणि तरीही प्रचंड गोंधळलेली चुमकी, तिच्या आयुष्यात वादळासारखा आलेला, निर्बंधपणे हवं तसं जगणारा पार्थ आणि एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर बदललेली त्यांची गोष्ट. मुली मोठ्या झाल्या, त्यांच्या संसाराला लागल्यानंतर त्यांचं करायच्या नादात आपलं स्वत:साठी जगणं राहूनच गेलं याची जाणीव झालेली, त्यासाठी प्रयत्न करणारी शिवानी आणि तिचा एकेकाळचा महाविद्यालयातील सहकारी परिमल (अनुपम खेर) यांच्या नात्याची प्रगल्भ गोष्ट. आणि या सगळ्यात वेगळंच असलेलं श्रुती (फातिमा सना शेख) आणि आकाश (अली फजल) हे जोडपं. करिअर की आवड, पैसा की कला, लग्न की नुसतीच साथ सगळ्याच बाबतीत गोंधळलेल्या, सतत तणावाखाली असलेल्या आकाशला समजून उमजून साथ देणारी श्रुती ही खूप सुंदर व्यक्तिरेखा या चित्रपटात पाहायला मिळते. शिवाय, आधी म्हटल्याप्रमाणे कुमारवयातील गोंधळाच्या गोष्टीचाही एक धागा यात आहे.
एकाअर्थी या सगळ्या स्वतंत्र गोष्टी आहेत, कुठेतरी त्या एका पात्रामुळे दुसऱ्या पात्राच्या गोष्टीत डोकावतात. हा भावभावनांचा कोलाज या चित्रपटात खूप सुंदर गुंफला गेला आहे. त्यात सगळेच कलाकार उत्तम आहेत. पंकज त्रिपाठी यांचा माँटी गमतीशीर आहेच, त्यांच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळाही आहे. तीच गोष्ट आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान दोघांनी साकारलेल्या पात्रांची…
इतकी सगळी पात्रं आणि त्यांच्या गोष्टी सांगण्याच्या नादात चित्रपट बऱ्यापैकी लांबला आहे. शिवाय, संगीतमय चित्रपटाचा दिग्दर्शकाचा आग्रह असल्याने गाणी चांगली असली तरी संगीतकार प्रीतम आणि त्यांचे दोघे सहकारी सतत गोष्टीत मध्ये मध्ये येतात. हा प्रकार थोडा कमी करता आला असता आणि लांबी थोडी आटोपशीर झाली असती तर आणखी प्रभाव पडला असता. पण उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय, उत्तम संगीत सगळ्याच बाबतीत कमाल असलेला ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट इतर तद्दन प्रेमपट, विनोदी भयपट, चरित्रपट या सगळ्यांच्या गर्दीत सुखद अनुभूती देतो.
मेट्रो इन दिनों
दिग्दर्शक – अनुराग बासू
कलाकार – आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, सारा अली खान, नीना गुप्ता, अनुपम खेर, फातिमा सना शेख, अली फझल, पंकज त्रिपाठी, सास्वता चॅटर्जी.