मुंबई : मध्य रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा असलेली लोकल सुरू करून गुरुपौर्णिमेची भेट दिली. ही लोकल गुरुवारपासून धावण्यास सुरुवात झाली असून, या लोकलच्या दिवसातून ७ ते १० फेऱ्या होतील. तसेच, टप्प्याटप्प्याने सर्व लोकलमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करण्यात येणार असून, मध्य रेल्वेवरील १,८१० लोकल फेऱ्यांंमधून प्रवास करणे ज्येष्ठांना सुकर होईल.
मध्य रेल्वेवरील ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला केला आहे. मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या मालडब्यात सुधारणा करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार केला आहे. या डब्यात १३ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहेत. ज्येष्ठांची सुरक्षितता लक्षात घेऊन दोन्ही दरवाजाच्या पायदानाखाली आपत्कालीन शिडी बसवण्यात आली आहे. तसेच लोकलचा हा सजविण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना लवकरच भेट देणार
पश्चिम रेल्वे प्रशासनही लोकलच्या मालडब्याचे रुपांतर स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक डब्यात करीत आहे. मालडब्यामध्ये सुधारणा केल्यानंतर त्यात १३ प्रवाशांची आसन व्यवस्था असेल. तसेच प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा उपलब्ध असेल. तसेच गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना लोकलमध्ये चढणे आणि उतरणे सहज शक्य होईल. हे बदल १०५ सामान्य लोकल रेकमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. हे काम एका वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच लोकलमधील इतर मालडबे कायम ठेवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेची सकारात्मक पावले
ज्येष्ठ नागरिकांना लोकल प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक लोकलमध्ये काही जागा आरक्षित आहेत. मात्र, लोकलमधील गर्दीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांना त्या जागेपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर उपाय म्हणून दिव्यांग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने न्यायलयाला आश्वासित केले होते. तसेच लवकरात लवकर कार्यादेश देण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने या कामाला सुरुवात केली.
सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुकर
मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा उपलब्ध केल्याने, त्यांचा प्रवास सुकर होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.