scorecardresearch

मढ किनारपट्टीवर दुर्मीळ ‘लॉगहेड’ कासव सापडले ; ऐरोली येथे उपचार सुरू

प्राथमिक तपासणीत कासवाला फुप्फुसाचा दाह असल्याने समोर आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मढ किनारपट्टीवर दुर्मीळ ‘लॉगहेड’ कासव सापडले ; ऐरोली येथे उपचार सुरू
मढ येथील सिल्व्हर समुद्र किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमारांना दुर्मीळ 'लॉगहेड' कासव दिसून आले.

मुंबई : मढ येथील सिल्व्हर समुद्र किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमारांना दुर्मीळ ‘लॉगहेड’ कासव दिसून आले. त्यानंतर याठिकाणाहून त्याची सुटका करून ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात दाखल केले. प्राथमिक तपासणीत कासवाला फुप्फुसाचा दाह असल्याने समोर आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन दिवसांपूर्वी मढ येथील सिल्वर किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमारांना मादी ‘लॉगहेड’ कासव दिसत होते. बराच वेळ कोणतीही हालचाल करत नसल्याने आणि कासव दुर्मिळ दिसून येत असल्याने मच्छिमारांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचून पोलिस व कांदळवन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी कासवाला ऐरोलीतील केंद्रात दाखल केले. या कासवाला बुधवारी डॉ. रीना देव यांच्या उपचार केंद्रात नेण्यात आले. ‘एक्स-रे’ चाचणीनंतर या कासवाला न्यूमोनिया असल्याचे समजले आहे. तसेच पाठीवर जखम झाल्याचेही दिसून आले. बरेच दिवस त्याने काही खाल्ले नसल्याचेही तपासणीत समजले. त्यानंतर पुढील उपचारासाठी या कासवाला ऐरोलीत दाखल करण्यात आले.

भ्रमणमार्ग शोधला जाणार

यावर्षी नोंद झालेल्या ‘लॉगहेड’ कासवांपैकी हे मादी कासव आकाराने मोठे असल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आले. या कासवाच्या पाठीवरील शेवाळ आणि ‘बारनॅकल्स’च्या प्रजातींची ओळख पटवून या कासवाचा भ्रमणमार्ग शोधला जाणार आहे. या मादी ‘लॉगहेड’ कासवावर योग्य उपचार करून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कांदळवन कक्षाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loggerhead turtle found at mud island mumbai print news zws

ताज्या बातम्या