मुंबई : माणसाचे जगणे समृद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्य, नाट्य, चित्र, संगीत अशा विविध क्षेत्रांशी संबंधित कलात्मक आणि वैचारिक श्रीमंत उपक्रमांनी नटलेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या मराठीतील पहिल्या आनंदसोहळ्याचा पडदा आज उघडेल. अभिजात लेखक, नाटककार आणि विचारवंत महेश एलकुंचवार यांच्या साक्षीने ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे उद्घाटन होणार आहे. निमंत्रितांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यानंतर १ नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीच्या या सौंदर्योत्सवाला सुरुवात होईल.
मराठीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा प्रथमच ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या निमित्ताने अनुभवायला मिळणार असून नावीन्यपूर्ण आणि विशेष रचित उपक्रम हे याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. विविधांगी साहित्यिक, सांगीतिक कार्यक्रम, विशेष नाट्यप्रयोग, कार्यशाळा, वैचारिक चर्चासत्रे आणि अशाच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी असणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे उद्घाटन गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी ख्यातनाम नाटककार, पटकथाकार आणि मराठीच्या परिघाबाहेरही बहुपरिचित असलेले विचारवंत महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होत आहे.
‘आत्मकथा’, ‘एका नटाचा मृत्यू’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘युगान्त’, ‘मग्न तळ्याकाठी’ यांसारखी अनेक अभिजात, विचारप्रवर्तक नाटके ज्यांच्या लेखणीतून उतरली असे प्राध्यापक, साहित्यिक, नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रमुख उपस्थिती ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ला लाभणार आहे. एलकुंचवार यांची नाटके इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषेतही गाजली आहेत. त्यांच्या साहित्याचे, नाटकांचे चाहते जगभर मोठ्या संख्येने विखुरलेले आहेत.
बहुआयामी प्रतिभा लाभलेल्या, वास्तवाशी नाळ जोडून राहणाऱ्या, तितकीच टोकदार भूमिका घेणाऱ्या, प्रतीकात्मक लेखनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या एलकुंचवार यांचे विचार ऐकण्याची संधी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने लाभणार आहे. एलकुंचवार यांच्या विचाराने आणि त्यांच्या उपस्थितीने भारलेल्या वातावरणात लिटफेस्टची औपचारिक सुरुवात झाल्यानंतर १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ रंगणार आहे.
प्राचीन परंपरा आणि रसरशीत वर्तमान असलेल्या मराठी काव्य, नाट्य, साहित्य, लोककला, शिल्प-चित्रकलेसारख्या विविध कलांमधील अभिजाततेचे दर्शन घडवणारे उपक्रम या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहेत.
