मुंबई : सत्य, असत्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभर सुरू आहेत. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची अनेक गटांकडून मागणी होत आहे. इतिहासाचे पुनर्लेखन जरूर करावे. आजपर्यंतचे इतिहास लेखन हे पुनर्लेखनच आहे. मात्र, पुनर्लेखन करताना कोणाचे भूतकाळातील स्थान हटवणे, अमुकच कथानक पुढे आणणे किंवा एखाद्या गटाविषयी द्वेष निर्माण करण्याचा हेतू नसावा, असे मत ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मधील चर्चासत्रात इतिहासाच्या प्राध्यापक श्रद्धा कुंभोजकर आणि इतिहास अभ्यासक हेमंत राजोपाध्ये यांनी व्यक्त केले.
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या अखेरच्या दिवशी ‘इतिहास: खरा की खोटा?’ हे चर्चासत्र ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या ‘कट्ट्या’वर शनिवारी पार पडले. ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ केळकर यांनी श्रद्धा कुंभोजकर आणि हेमंत राजोपाध्ये यांच्याशी संवाद साधला. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांचाच इतिहास आपल्याला अभ्यासायचा असतो. आपल्याला फक्त सुवर्णयुगाचा इतिहास हवा. आपण एक कथानक ठरवतो आणि त्यासाठी तशी साधनेही निवडतो,’ असे सांगताना राजोपाध्ये यांनी इतिहासाची साधने आणि त्याचे प्रमाणीकरण या दोन्हींबाबत परखड मत मांडले. ‘साधनांचे प्रामाण्य परस्पर विसंगत व विसविशीत संज्ञा आहे. प्रामाण्य मानणे व्यक्तिनिष्ठ, समूहनिष्ठ व राजकीय परस्थितीशी निगडित असते. डाव्या व उजव्या गटांनी आपापल्या सोयीची इतिहास साधने लोकांसमोर ठेवली आहेत. प्रामाण्य ही गोष्ट आपण सार्वजनिक आणि शैक्षणिक क्षेत्रात फारच खालच्या पातळीवर आणून ठेवली आहे,’ असे ते म्हणाले.
इतिहासाच्या साधनांचे प्रकार मांडताना कुंभोजकर यांनी त्याबाबत शास्त्रीय मांडणी केली. ‘साधने नेहमी गलका करतात. साधने खोटी असू शकतात, अतिशयोक्तीपूर्णही असू असतात. म्हणून साधनांमधून कोण बोलते हे समजून घ्यायला हवे. इतिहासाची चर्चा करण्याची मोकळीक हवी. अन्यथा इतिहास अभ्यासकाला स्वयंनियमन मागे ओढू शकते. ऐतिहासिक चित्रपट-नाटकांमध्ये विसंगती असल्या तरी त्याकडे इतिहासकाराने तुच्छतेने पाहू नये. ऐतिहासिक कलाकृतीसंदर्भात प्रेक्षकांना काही शिकवण्याची आवश्यकता नसली तरी असे चित्रपट जी मंडळी पाहू देत नाहीत, त्यांच्या प्रबोधनाची मात्र गरज आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
पाठ्यपुस्तक लेखनासाठी अभ्यासकच हवेत
इतिहासाचे वर्तमान आणि भविष्य यांवर चर्चा करताना राजोपाध्ये यांनी ‘सामान्यांपर्यंत नाटक-चित्रपट यांच्याच माध्यमांतून इतिहास पोहोचतो. आता कृत्रिम प्रज्ञा आली आहे. त्यामुळे वेगळा इतिहास समोर येऊ शकतो,’ अशी भीती व्यक्त केली. तर, कुंभोजकर यांनी ‘माध्यमे बदलतील तरी इतिहास राहणारच. नवीन आव्हानांना तोंड देण्याचा चिवटपणा आपल्या बहुविध संस्कृतीच्या गोधडीत आहे. त्यामुळे आपल्याकडे संस्कृतीचे सपाटीकरण सहजासहजी होणे शक्य होणार नाही,’ अशी भूमिका मांडली. मात्र, दोन्ही अभ्यासकांनी पाठ्यपुस्तक लिखाणात तज्ज्ञच हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘पाठ्यपुस्तके अत्यंत महत्त्वाची आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्या गटाच्या नायकांनाच स्थान मिळावे, अशी काही गटांची मागणी रास्तच आहे. अलीकडे पाठ्यपुस्तक लेखनामागे बालभारतीचा विशिष्ट हेतू दिसतो,’ अशी टीकाही त्यांनी केली.
● मुख्य प्रायोजक : सारस्वत बँक
● सहप्रायोजक : केसरी टूर्स
● सहाय्य : कौटिल्य मल्टिक्रिएशन, सी एफ एस
● पॉवर्ड बाय : कालनिर्णय
● आऊटडोअर पार्टनर : रौनक अॅडव्हर्टायझिंग
