या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकार राष्ट्रपती राजवट लागू करून खाली खेचण्याचा केंद्र सरकारचा निर्णय तेथील उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर या विषयावर सरकारला चपराक लगावणारा ‘लोकसत्ता’मधील ‘सणसणीत श्रीमुखात’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा पुण्यातील ‘विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’चा बबन सावंत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. तर, पुणे जिल्ह्याच्या बारामतीमधीलच ‘एम. एस. काकडे महाविद्यालया’ची युसिरा अत्तार हीने दुसरे पारितोषिक पटकावले आहे. त्यामुळे, या वेळी ‘ब्लॉग बेंचर्स’च्या विजेतेपदाचा मान पुणे जिल्ह्याकडे गेला आहे.

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला झटका बसला होता. उत्तराखंडमधील काँग्रेस सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाऊ देण्याआधीच केंद्राने तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली होती. केंद्र सरकारचा हा मनमानीपणा असून उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत या सरकारला चपराक लगावली. ‘सणसणीत श्रीमुखात’ या अग्रलेखात नेमक्या याच मनमानीपणावर बोट ठेवण्यात आले होते. याच अग्रलेखावर बबन व युसिरा यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. बबनला सात हजार आणि प्रमाणपत्र तर युसिराला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षीसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे.  विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरूणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers  या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta blog benchers winner
First published on: 05-05-2016 at 02:27 IST