शिक्षण क्षेत्रात निर्णय घेणारे आणि तो घेण्यास भाग पाडणारे अशा दोनच गटांचे सध्या राज्य असल्याचे चित्र दिसत असून देशाच्या भवितव्यासाठी ते योग्य नाही. शिक्षण क्षेत्रात विविध संस्था आणि संघटनांचे बालहट्ट पुरवण्यापूर्वी त्याची उपयुक्तता आणि परिणामकारकता याची तपासणी केली नाही तर अधिक भयावह संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करणाऱ्या ‘शिक्षणाची त्रेधातिरपीट’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा मुंबईतील सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी सत्यजित घोडके ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर या स्पर्धेत उदगीर येथील ‘एम.एस.पी.एम. फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालया’चा विद्यार्थी अंगद सुतार याने दुसरे पारितोषिक पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शिक्षणाची त्रेधातिरपीट’ या अग्रलेखावर मत मांडणाऱ्या सत्यजित व अंगद यांनी चांगले लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. सत्यजितला सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर अंगदला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारी वृत्तीला चालना देत लेखन केले.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

तसेच विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना यानिमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta blog benchers winner
First published on: 10-11-2016 at 00:46 IST