scorecardresearch

पाखरांचा आशियाना

सुनीता मूळच्या इचलकरंजीच्या. सचिन शिंगारे यांच्याशी लग्न होऊन २०१२ मध्ये त्या सांगलीला आल्या

Loksatta Navdurga Program
सुनीता शिंगारे

सांगलीच्या गावभागात राहणाऱ्या सुनीता जखमी पक्षी सांभाळण्याबरोबरच महत्त्वाचे काम करतात ते म्हणजे चिमण्यांना आणि इतर पक्ष्यांना स्वत:चं घरं मिळावं यासाठीचे उपक्रम. त्यासाठी पक्ष्यांना राहण्यासाठी स्वत: खोपे तयार करून त्या वाटतात; इतकेच नव्हे तर पक्षी झाडांवरून पडून मरू नयेत म्हणून झाडांना जाळ्या लावण्याचे कामही त्या करतात. कमी होत चाललेली चिमण्यांची संख्या लक्षात घेऊन शाळांशाळांमध्ये जाऊन ते वाचवण्यासाठी जागृती करणाऱ्या, स्पर्धा घेणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, सुनीता शिंगारे.

आधुनिकीकरणात गावांची शहरे होत गेली. सिमेंटच्या जंगलात माणसांना राहायला आसरा मिळाला. मात्र चिमणी-पाखरं बेघर झाली. याच चिमण्या-पाखरांना हक्काचा आशियाना मिळवून देण्याचं आगळंवेगळं काम करत निसर्गाचा समतोल राखण्याचं शिवधनुष्य उचललं आहे सांगलीच्या गावभागात राहणाऱ्या सुनीता शिंगारे यांनी. जखमी, आजारी पक्ष्यांची देखभाल करणे, चिमण्या आदी पक्ष्यांना राहण्यासाठी स्वत: खोपे तयार करून ते वाटणे, पक्षी झाडांवरून पडून मरू नयेत यासाठी झाडांना जाळ्या लावणे; इतकेच नव्हे तर शाळांशाळांमध्ये जाऊन चिमण्या वाचवण्यासाठी जागृती करण्याचे काम सुनीता करत आहेत.

सुनीता मूळच्या इचलकरंजीच्या. सचिन शिंगारे यांच्याशी लग्न होऊन २०१२ मध्ये त्या सांगलीला आल्या. सचिन पक्षीप्रेमी आणि अभ्यासक-निरीक्षक. लग्नाला साधारणत: दोन-तीन महिने झाले असतानाच एके दिवशी सचिन एका पांढऱ्या मानेच्या जखमी करकोचाला घरी घेऊन आले. जवळच्या आष्टा गावात विजेच्या खांबाला धडकून तो करकोचा जखमी झाला होता. सचिनचा प्रिटिंगचा व्यवसाय असल्यानं दिवसभर त्या करकोच्याला सांभाळणं त्यांना शक्य नव्हतं. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीतांनी त्या करकोच्याचे औषधपाणी, खाणंपिणं सांभाळलं. खरं तर त्या एवढा मोठा पक्षी प्रथमच हाताळत होत्या, त्यामुळे त्या थोडय़ा घाबरल्याही, मात्र सवयीनं त्यांची भीती गेली. या सेवेमुळे तो करकोचा दोनच दिवसांत बरा झाला आणि त्याला कृष्णेच्या घाटावर सोडल्यावर त्याने आकाशात भरारी घेतली. त्याच्या भरारीने सुनीता यांना पक्षी सुरक्षेचा मार्ग स्वच्छ दिसू लागला.

सुनीता आणि सचिन यांच्या पक्षी प्रेमाची माहिती जवळपासच्या गावांमध्ये समजल्यावर लोक स्वत:हूनच त्यांच्याकडे जखमी पक्ष्यांना घेऊन येऊ लागले किंवा फोनकरून सांगू लागले. सचिन घरी नसले तर सुनीता त्यांना फोन वरून त्या पक्ष्याचे वर्णन सांगून त्या पक्ष्याला काय खायला द्यायचे, कोणते उपचार करायचे याविषयी विचारून त्याप्रमाणे सगळं निगुतीनं करायच्या त्यातूनच सुनीता यांना पक्षी निरीक्षणाची आणि अभ्यासाची आवड निर्माण झाली. पुढे त्यांची एक नोंदवहीच तयार केली. त्या वहीत आतापर्यंत सांभाळलेल्या पक्ष्यांच्या नोंदीही ठेवल्या आहेत. हुदहुद, चिमणी, बुलबुल, सुगरण, तांबट, शिंपी, कोतवाल, कोकीळ, खंडय़ा, वंचक, करकोचे, पाणकावळे, राित्रचर बगळे, कावळा, शिक्रा, गव्हाणी घुबड, टिटवी, जांभळी पाणकोंबडी, घार, साळुंखी, मना असे अनेक पक्षी या वहीतल्या यादीत सापडतात.

औषधोपचार देत असताना घरी सण-वार असला तरी मासे आणून त्यांना खायला घालण्याचे काम सुनीता करतात. त्यांचा मुलगा लहान आहे, त्याला भरवताना म्हणजे अनेकदा एका मांडीवर स्वत:चा मुलगा तर दुसऱ्या मांडीवर एखादे पिलू एकाच वेळी भाताची पेज खातात. हे अर्थात घरची सामान्य आर्थिक परिस्थिती सांभाळून. त्यामुळे अनेकदा तडजोडही करावी लागली आहे. एकदा तर ‘पाहुण्या’ करकोच्याला अंड खाऊ घालणं गरजेचं होतं नि घरात एकच अंड होतं जे त्यांनी आपल्या बाळासाठी जपून ठेवलं होतं. त्यावेळी काही क्षण त्यांचं मातृहृदय द्विधा झालं. मात्र मुलाला इतर खाऊ देऊन समजूत काढता येईल मात्र करकोच्याला भरवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी ते अंडं त्या करकोच्याला खाऊ घातलं.

शिंगारे यांचं घर तसं छोटेखानीच आहे. तेथे स्वागत होते ते लव्ह बर्डच्या चिवचिवाटानं. घरात दर्शनी भागातच भिंतीला लटकलेले पाखरांसाठी तयार केलेले रंगीत मनोवेधक खोपे पाहण्यास मिळतात.  सध्या सुनीता पक्षी सांभाळण्याबरोबरच महत्त्वाचे काम करतात ते म्हणजे चिमण्यांना आणि इतर पक्ष्यांना स्वत:चं घरं मिळावं यासाठीचे उपक्रम. सांगलीजवळील हरिपूरच्या संगमेश्वर मंदिरात ते दोघे गेले असता तेथील पुजाऱ्यांनी मंदिरात घरटी बांधणाऱ्या चिमण्यांची समस्या सांगितली. पक्षीमित्र असल्याने दोघांनीही चिमण्यांचे घरही सुटणार नाही आणि मंदिरही स्वच्छ राहील यावर विचार करायला सुरुवात केली. घरातली आंब्याची पेटी पाहून सुनीतांना एक कल्पना सुचली. लाकडी पट्टय़ा काढून त्याचे छानसे चौकोनी खोके बनविले आणि ते घरासमोर टांगले. आणि आश्चर्य म्हणजे आठ दिवसांत एका चिमणीने त्या घरटय़ात आपला संसार थाटला आणि सुनीतांना उत्तर सापडले. त्यांनी तशी अनेक घरटी करून मंदिर परिसरात लावली आणि पुजाऱ्यांचा प्रश्न सोडवला.

कमी होत चाललेल्या चिमण्यांना वाचवण्याचा हा उत्तम मार्ग त्यांना सापडला. २० मार्चच्या ‘चिमणी दिना’चे निमित्त साधून चिमण्यांबाबत जनजागृती करण्यासाठी चित्रकला स्पर्धा, जनजागृती कार्यक्रम घेण्यास त्यांनी सुरुवात केली. तेथे त्यांनी फळमार्केटमधून आणलेल्या रिकाम्या खोक्यांपासून बनवलेले खोपे मोफत द्यायला सुरुवात केली. कदाचित फुकट असल्याने लोकांनी काही दिवसांत फेकून दिले किंवा तोडून टाकले. मग त्यांनी त्यांचे एक पक्षीमित्र संजय पोंक्षे यांच्या घरासमोरील बागेत ही घरटी अडकवली. त्यात असलेले पक्षी पाहून मग त्यांच्याकडे येणाऱ्या अनेकांनी त्या घरटय़ांविषयी विचारणा केली आणि त्यातून मग घरटी विक्री सुरू झाली. मुलांनी चिमणी संवर्धनाबाबत सजग व्हावे, यासाठी मग खोपे रंगवण्यास, अधिक आकर्षक करण्यास प्रारंभ केला. आतापर्यंत साडेपाचशेहून अधिक खोपे विकल्याचे त्यांनी सांगितले.

मंदिर, मशिदीमध्ये स्वखर्चाने घरटी बसवून पाखरांना आशियाना देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. खोपा बनवण्याचे ज्ञान अधिकाधिक लोकापर्यंत पोहचावे, यासाठी शाळांमधून मुलांना घरटे तयार करण्यासाठीचे धडेही त्या देत आहेत. आज निसर्ग रक्षणासाठी कार्य करणाऱ्या ‘आभाळमाया’चे पदाधिकारीही या खोप्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम करीत आहेत.

पक्षी वाचवण्याची गरज त्यांना आणखी एका गोष्टीमुळे वाटू लागली. वादळ, वारे, जोराचा पाऊस यामुळे बऱ्याच वेळा पक्षी झाडावरील घरटय़ातून खाली पडतात. यामुळे लहान पिलू असेल तर त्याचे मरण ठरलेलेच. हे लक्षात आल्यावर सुनीता यांनी घराजवळ असलेल्या शास्त्री उद्यानातील झाडांना जाळी लावली. मात्र तरीही काही पक्षी किरकोळ जखमी होतातच. या पाखरांच्या पंखाला झालेली जखम डेटॉलने धुऊन मलम लावून बरं करण्यात मनस्वी आनंद होत असल्याचे त्या सांगतात. चार दिवसांत पक्षी बरा होऊन फिरू लागला की, बास्केटमध्ये घालून त्याला कृष्णातीरावर त्याच्या अधिवासात सोडले जाते. आतापर्यंत २५० हून अधिक पिलांना त्यांनी जीवदान दिले आहे.

सांगलीच्या गावभागात राहून शेकडो पक्ष्यांना जीवदान देणाऱ्या, असंख्य जखमी पक्ष्यांची देखभाल करणाऱ्या आणि चिमण्या रक्षणांसाठी जगजागृती करत पर्यावरणाचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनीता शिंगारे यांना आमचा सलाम!

सुनिता शिंगारे

८६१, विनायक चौक, सेना मंदिर रोड, अंकली पोलीस चोकीपाठीमागे,

गावभांग, सांगली – ४१६४१६

मोबाइल क्रमांक – ७०२८५०४१२५

khopabirdshouse@gmail.com

 

‘लोकसत्ता दुर्गा २०१७’चे टायटल पार्टनर  आहेत केसरी.

या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत देना बँक, व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स आणि राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायजर्स  लिमिटेड.

एम्पॉवर्ड बाय निर्लेप.

नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2017 at 01:23 IST
ताज्या बातम्या