रत्नागिरीची मैत्रेयी बांदेकर दुसरी तर नाशिकची श्वेता भामरे तिसरी; विद्यार्थी वक्त्यांच्या आविष्काराने महाअंतिम फेरीत रंगत
अवघड नावीन्यपूर्ण तसेच विचारप्रवृत्त करणारे विषय, त्यावर विद्यार्थी वक्त्यांनी केलेली विचारगंभीर फटकेबाजी, ते करताना विषयाच्या सादरीकरणापासून मांडणीपर्यंत लागलेला कस आणि एखाद्या चमकदार वाक्यावर, विचारावर भरगच्च भरलेल्या सभागृहाकडून मिळणारी टाळ्यांची उत्स्फूर्त दाद.. अशा वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेचा उत्कर्षिबदू होता तो अर्थातच स्पर्धेचा निकाल. तो जाहीर झाला आणि पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून गेले. कारण बहुधा श्रोत्यांनी आपल्या मनातील महाराष्ट्राचा महावक्ता आधीच ठरवून ठेवला होता. तो होता पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा शंतनू रिठे. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली ती मैत्रेयी बांदेकर, तर तिसरा क्रमांक पटकावला श्वेता भामरे हिने. तिलाच लालित्यपूर्ण शैलीसाठीचे प्रा. वसंत कुंभोजकर पारितोषिक मिळाले. मंथन बिजवे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड-पुणे, एमआयटी-औरंगाबाद, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट ‘आयसीडी’-औरंगाबाद ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेचे यंदा हे तिसरे वर्ष होते. महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ नाटय़-चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि ज्येष्ठ वृत्तनिवेदक व बाल साहित्यिक अनंत भावे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. राज्यातील आठ केंद्रांवर झालेली प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पार करत प्रिया तरडे-मुंबई (रुपारेल महाविद्यालय), श्वेता भामरे-नाशिक (के.टी.एच.एम. महाविद्यालय), शंतनू रिठे-पुणे (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ), मंथन बिजवे-नागपूर (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला), आकांक्षा चिंचोलकर-औरंगाबाद (देवगिरी महाविद्यालय), प्रज्ञा पोवळे-ठाणे (जोशी-बेडेकर महाविद्यालय), मैत्रेयी बांदेकर-रत्नागिरी (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय), आदित्य वडवणीकर-अहमदनगर (रावबहाद्दूर नारायणराव बोराक्के महाविद्यालय) हे आठ विद्यार्थी महाअंतिम फेरीत पोहोचले.
महाअंतिम फेरीसाठी सर्वच विद्यार्थ्यांनी कसून तयारी केली होती. आता वेळ होती ती परीक्षक आणि उपस्थित श्रोत्यांसमोर आपली वक्तृत्व कला सादर करण्याची. सुरुवातीला या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे दडपण व उत्सुकता पाहायला मिळाली. पण काही क्षणातच ते आश्वस्त झाले आणि त्यांना मिळालेला विषय त्यांनी मांडायला सुरुवात केली. महाअंतिम फेरीची सुरुवात प्रिया तरडेने सादर केलेल्या ‘आजच्या जगाचे वर्तमान’ या भाषणाने तर समारोप प्रज्ञा पोवळेने सादर केलेल्या ‘चक्रम गेले कुठे’ या भाषणाने झाला. श्वेता भामरे (तैमूरचे बारसे), मंथन बिजवे (जगाचे सपाटीकरण), शंतनू रिठे (माझा भ्रष्टाचार), आकांक्षा चिंचोलकर (चलनाचे वलन), आदित्य वडवणीकर (इतिहासाचे भान आणि भार), मैत्रेयी बांदेकर (सर्जक संहार) या सहा जणांनीही त्यांना मिळालेला विषय नेटकेपणाने सादर केला. आता प्रतीक्षा होती ती निकालाची. अगोदर उत्तेजनार्थ व नंतर तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांकाची घोषणा झाली आणि सभागृहात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.
रंगलेल्या या महाअंतिम फेरीतील विद्यार्थी वक्ते आणि प्रमुख मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांचे भाषण ऐकण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक श्रोत्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’चे रोहन टिल्लू यांनी केले, तर ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी अविनाश धर्माधिकारी यांचा परिचय करून दिला आणि उपस्थितांचे आभार मानले.
- ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पध्रेत जिंकल्यामुळे महाराष्ट्रातील वक्त्यांच्या परंपरेला वंदन करू शकलो याचे समाधान आहे. भाषणात आलेले सर्व मुद्दे हे स्वानुभवातून आलेले आहे. मी फक्त तयारीच्या जोरावर भाषण केले असते तर मी माझ्या स्वानुभावाशी प्रतारणा केली असती. – शंतनु रिठे, प्रथम विजेता (विषय : माझा भ्रष्टाचार)
- पहिल्यांदा ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पध्रेत सहभागी झाले आणि जिंकले याचा आनंद आहे. विषयाची तयारी करण्यासाठी २४ तासांचा अवधी होता त्यामुळे तयारीसाठी फार वेळ नव्हता. त्यामुळे अनुभवातून भाषणाची तयारी केली. – मत्रेयी बांदेकर, द्वितीय विजेता (विषय : सर्जक संहार)
- दोन्ही पारितोषिक मिळाल्यामुळे आनंदच झाला आहे. कालच विषय हाती आल्याने त्यावर अभ्यास करून त्याची मांडणी करणे कठीण होतं पण ते मी केलं आणि यश आता हाती लागलं आहे. शिवाय ऐकणाऱ्या श्रोत्यांचा आणि परीक्षकांचा प्रतिसाद सकारात्मक मिळाल्यामुळे आपण विषयाची मांडणी योग्य पद्धतीने केली असल्याचे समाधान मिळाले आहे.
– श्वेता भामरे, तृतीय आणि लालित्यपूर्ण शैलीसाठीचा प्रा. वसंत कुंभोजकर पुरस्कार (विषय : तैमूरचे बारसे)
- इतर वक्तृत्त्व स्पर्धा आणि ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेली वक्तृत्त्व स्पर्धा यांमध्ये गुणवत्ता, विषय यांमध्ये फार मोठी तफावत जाणवते. त्यामुळे लोकसत्ता वक्तृत्त्व स्पध्रेत विषयाची मांडणी करताना ती योग्य पद्धतीने करावीच लागते. – मंथन बिजवे, उत्तेजनार्थ पारितोषिक (विषय : जगाचे सपाटीकरण)
- ‘वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने तरुण सहभागी झाले याचा अतिशय आनंद आहे. लोकशाहीत बोलणे, व्यक्त होणे याला महत्त्व आहे, आणि याची जाणीव ठेवून तरुण मुले अभ्यास, आकलन करीत आहेत. मुलांनी उज्ज्वल भविष्यासाठी प्रश्न विचारण्याची सवय लावायला हवी, त्यातून मुलांचा अभ्यास दिसतो आणि अभ्यास असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकता. – अनंत भावे, परीक्षक
- ‘वक्ता दशसहस्रेषु’ या कार्यक्रमात राज्यातील आठ विभागातून निवडून आलेली मुले सहभागी झाले होते, त्यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक चित्र या व्यासपीठावर पाहावयास मिळाले. एक भाषण ऐकतो त्या वेळी अनेक पुस्तक वाचल्याचे समाधान मिळते. विषयाचे उत्तम भान, आकलन आणि अभ्यास असले तर आपले व्याख्यान प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. या स्पध्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक वक्त्याची शैली आणि भाषण मांडण्याची धाटणी वेगळी होती. ही विचारांची, शब्दांची आणि अभिव्यक्तीची स्पर्धा आहे. मात्र अशा स्पर्धाना तिकिटे आकारण्यात आली, तर प्रेक्षकांची गर्दी होत नाही ही आपली शोकांतिका आहे. – चंद्रकांत कुलकर्णी, परीक्षक