मुंबई: लोकल ट्रेन पकडताना तोल जाऊन पडणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी वाचवले आहे. किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री ही घटना घडली. मंगळवारी रात्री किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकात एक प्रवासी उभा होता. रात्री ११ वाजून ५० मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात जाणारी ट्रेन आली. रेल्वे स्थानकात गर्दी नव्हती मात्र धावती ट्रेन पकडत असताना त्याचा तोल गेला. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असणाऱ्या वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानाने ते पाहिले. त्यांनी धावत जाऊन या प्रवाशाला खेचून बाहेर काढले. हा प्रवासी सुखरूप असून त्याला केवळ खरचटले आहे.

जर विलंब झाला असता तर प्रवासी फलाट आणि लोकल ट्रेनच्या मध्ये गेला असता. आमच्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवले आणि क्षणाचाही विलंब न लावता या प्रवाशाचे प्राण वाचवले असे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असरुद्दीन शेख यांनी सांगितले. लोकल ट्रेन पकडताना घाई करू नये आणि आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

रेल्वे मध्ये वाढते अपघात

शहराची लोकसंख्या सतत वाढत असल्याने त्याचा लोकल ट्रेनवरील ताण वाढतो आहे. प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून खाली पडणे, रुळ ओलांडताना, फलाटावरील पोकळीत पडून, वीजेचा धक्का लागून, तसेच चेंगराचेंगरीमुळे दररोज अपघात होतात.

रोज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर होणाऱ्या अपघातात सरासरी ८ जणांचा मृत्यू होतो. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते मे २०२५ या १० वर्षांच्या कालावधीत एकूण २६ हजार ५४७ जणांचा विविध अपघात आणि दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ जणांचा मृत्यू हा रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे. त्यापाठोपाठ ट्रेन मधून पडणे, रेल्वे खांबाला धडक, वीजेचा धक्का, आत्महत्या आदी कारणांचा समावेश आहे.