मुंबई : प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या २५ दुर्मीळ चित्रांच्या लिलावास उच्च न्यायालयाने नुकताच हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार, येत्या १२ जून रोजी दक्षिण मुंबईतील हॅमिल्टन हाऊस येथे हुसैन यांच्या या २५ दुर्मीळ चित्रांचा लिलाव होणार आहे. कर्ज बुडवल्याच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने (नाफेड) ती चित्रे ताब्यात घेतली होती. ‘एम एफ हुसैन: अॅन आर्टिस्ट्स व्हिजन ऑफ द एक्सएक्स सेंच्युरी’ या शीर्षकाखाली हा लिलाव होणार असून त्यात हुसैन यांच्या ओपीसीई – अवर प्लॅनेट कॉल्ड अर्थ – मालिकेचा भाग असलेल्या २५ दुर्मीळ चित्रांचा समावेश आहे.
उद्योगपती गुरु स्वरूप श्रीवास्तव यांच्या स्वरूप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजशी संबंधित २३६ कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित वादात नाफेडद्वारे हुसैन यांची २५ दुर्मीळ चित्रे ताब्यात घेण्यात आली होती. या चित्रांचा लिलाव करण्यास न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठाने मुंबईच्या शेरीफना परवानगी दिली.
हुसैन यांच्या १०० चित्रांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची बोली लावून श्रीवास्तव हे २००७ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. गेल्या वर्षी मे महिन्यात कला तज्ज्ञ दादीबा पुंडोले यांनी उच्च न्यायालयाला या चित्रांचा मूल्यांकन अहवाल सादर केला होता. त्यात, त्यांची किंमत २५ कोटी रुपये असल्याचे नमूद केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबईच्या शेरीफ यांनी फेब्रुवारीमध्ये पुंडोले कला दालनाच्या माध्यमातून या चित्रांच्या लिलावासाठी नोटीस काढली होती.
दरम्यान, न्यायालयाने या चित्रांच्या लिलावाला परवानगी देताना लिलाव पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल मुंबईच्या शेरीफ याना ३ जुलैपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिेले. त्यानंतर, कलाकृती हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेले अंतिम आदेश मिळवावेत, असेही एकलपीठाने स्पष्ट केले.
प्रकरण काय ?
सीबीआयने २००६ मध्ये स्वरूप ग्रुप आणि श्रीवास्तव यांच्याविरुद्ध नाफेडकडून घेतलेल्या २३६ कोटी रुपयांच्या कर्जापैकी १५० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू केली होती. डिसेंबर २००८ मध्ये संबंधित न्यायाधिकरणाने हुसैन यांच्या २५ दुर्मीळ चित्रांसह एकूण १०० कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यास नाफेडला परवानगी दिली.