मुंबई : कोल्हापूरच्या ‘माधुरी’प्रमाणेच जोतीबाच्या गडावरल ‘सुंदर’ नावाचा हत्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. जवळपास पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्सने (पेटा) या हत्तीबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यानंतर सुंदरला बंगळुरू येथील बाणेरगट्टा अभयारण्यात सोडण्यात आले.
सुंदर हा २००७ मध्ये पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी जोतिबाच्या सेवेत राहण्यासाठी सुंदर हत्ती आणला होता. लहानपणापासून भाविकांमध्ये तो खूप लोकप्रिय होता. विशेषत: गुढीपाडव्याच्या पालखीत असणाऱ्या हत्तींपैकी तो एक होता. त्याच्या संगोपनाकडे दुर्लक्ष झाल्याची गंभीर तक्रार पेटाने केली होती.
दरम्यान, पेटा इंडियाने २०१२ नंतर सुंदरवर होणाऱ्या छळाची एक चित्रफित प्रसारित केली, याला पॉल मॅककार्टनी, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आदीं ख्यातनाम व्यक्तींचे समर्थन मिळाले होते. पेटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि अखेर न्यायालयाने सुंदरला बाणेरगट्टा अभयारण्यात पाठविण्याचा आदेश दिला. त्यानंतर ५ जून २०१४ रोजी डॉक्टरांच्या चमूसह सुंदरला कोल्हापूरहून जवळपास ७०० किमी दूर बेंगलोर जवळील बाणेरगट्टा येथील पुर्नवसन केंद्रात हलवण्यात आले.
सुंदरचा जाण्यास नकार
माणसांशी भावनिक नातं जोडलेला सुंदर अभयारण्यात जायला तयार नव्हता, त्यामुळे त्याला भुलीचे इंजेक्शन देण्याची वेळ वन विभागावर आली होती. लोकक्षोभ निर्माण होऊ नये यासाठी भल्या पहाटेपासून त्याच्या स्थलांतराची मोहीम राबवण्यात आली होती.
बाणेरगट्टाला गेल्यावर सुंदरची मानसिक स्थिती बिघडली. या अवस्थेतून अभयारण्यातील एका कर्मचाऱ्याला त्याने मारले होते .पुढील दोन-तीन वर्षांत मानसिक तणावामुळे सुंदरचा मृत्यू झाला, असा आरोप स्थानिकांनी केला. स्रोतांनुसार सरकारने माहिती दिली नव्हती काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री विनय कोरे यांच्या कार्यकर्त्यांनी अभयारण्यात भेट दिल्यानंतर ही माहिती समोर आली.
चार दिवस स्थलांतरासाठी वन विभागाची धडपड
सुंदरच्या स्थलांतरासाठी ४ दिवस वन विभाग धडपडत होता. पहिल्या दिवशी खुप प्रयत्न करूनही सुंदर वाहनामध्ये चढण्यास तयार झाला नाही. दुसऱ्या दिवशी जोरदार पावसामुळे स्थलांतराच्या प्रयत्नावर पाणी पडले. तिसऱ्या दिवशीही मर्यादा आल्यानंतर ही मोहीम पूर्ण झाली नाही. त्यानंतर चौथ्या दिवशी सुंदरला हलवण्याचा अखेरचा जोरदार प्रयत्न केला. त्याला सिडॅसन माइल्ड नावाचे इंजेक्शन देण्यात आले. त्याच्या औषधाच्या प्रभावामुळे तो वन विभागाच्या काबूत आला होता. कणीस, फणस अशा खाऊचे आमिष दाखवून वन विभागाच्या पथकाने मागून रेटा लावत सुंदरला ट्रकमध्ये चढविले. सुंदरला साखळदंड व दोरखंडाने बांधण्यात आले होते. अशा अवस्थेतही सुंदरला वाहनामध्ये चढवताना वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
बचाव केलेल्या हत्तींच्या सहवासात
अभयारण्यात सुंदरला बचाव केलेल्या इतर १३ हत्तींसोबत ठेवण्यात आले होते. तेथील लक्ष्मी आणि शिवा या हत्तींसोबत तो प्रामुख्याने मिसळून गेला.
मृत्यू आणि वाद
सुंदरचा मृत्यू २६ ऑगस्ट २०२२ रोजी झाला. अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरवर तीव्र कोलिक (पोटदुखी) आणि तोंडातील व्रण यावर उपचार सुरू होते, परंतु काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानुसार सुधारणा दिसत असतानाही उपचारानंतर सुंदकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. दरम्यान, कोल्हापूरमधील भाविक आणि विनय कोरे यांनी सुंदरच्या मृत्यूबाबत सरकारला जाब विचारला होता.