मुंबई: निवडणूक आयोगाच्या सदोष मतदारयाद्यांविरोधात महाविकास आघाडी व मनसेच्या वतीने उद्या ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा दुपारी १ वाजता निघणार असून या मोर्चात शिवसेना (ठाकरे), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शेकाप, कम्युनिस्ट आदी पक्ष सहभागी होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत सदोष मतदारयाद्यांमुळे मतदारांची संख्या वाढली. परिणामी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले व सत्ताधारी महायुतीला अनपेक्षित यश मिळाल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्यामुळे या मतदारयाद्यांत दुरुस्ती झाल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी विरोधकांची मागणी आहे. निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून याविरोधात तिव्र लढ्याचा इशारा देण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून उद्या शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार याद्यांबाबत घेतलेले आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत.
१ जुलै हा आधार मानून मतदारयादीच्या वापरास विरोधकांचा आक्षेप आहे. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर हा आधार मानून मतदारयाद्या वापरण्यास मिळाव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यावर निवडणूक आयोगाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर उद्याच्या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने विरोधकांचे सारे आक्षेप फेटाळल्याने महाविकास आघाडी व मनसेकडून पुढील रणनीती या वेळी जाहीर केली जाईल.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर सायंकाळी ४ पर्यंत मोर्चा संपविण्यात येईल, असे आश्वासन विरोधकांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.
