मुंबई : राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मोठ्या धरणांतील पाणीसाठा ९३.१२ टक्क्यांवर गेला आहे. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ७७.८३ टक्के तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा ५७.१८ टक्क्यांवर गेला आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु, अशा २९९७ धरणांतील एकूण पाणीसाठा ८५.७९ टक्क्यांवर गेला आहे.

धरणांमधील पाणीसाठ्यात कोकण विभागाने आघाडी घेतली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु, अशा सर्वच प्रकारच्या धरण प्रकल्पांचा विचार करता, कोकण विभागातील धरणांत ९२.५५ टक्के, पुणे विभागात ९१.४९ टक्के, नाशिक विभागात ७९.३२ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८१.१० टक्के, अमरावती विभागात ८४.९७ टक्के आणि नागपूर विभागात ७७.९८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

मोठ्या धरणांतील पाणीसाठा ९३.१२ टक्क्यांवर गेला आहे. नागपूर विभागातील मोठ्या धरणांत ७६.७५ टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित सर्व विभागांत ९० टक्क्यांहून जास्त पाणीसाठा झाला आहे. पुणे, कोकण विभागात ९७ टक्के, नाशिकमध्ये ९३ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९४ टक्के आणि अमरावती विभागातील धरणांत ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

लघु प्रकल्पांत पाणीसाठा कमी

राज्यात एकूण २५९९ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठा ५७.१८ टक्क्यांवर गेला आहे. या प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा ३९४८ दलघमी इतका झाला आहे. नाशिक, पुणे विभागातील लघु प्रकल्पांतील पाणीसाठा ५० टक्क्यांवरही गेला नाही. मोठे प्रकल्प बहुतेक करून मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होणाऱ्या आणि नद्यांच्या मुख्य पाणलोट क्षेत्रात असतात. लघु प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमता कमी असते. शिवाय, हे प्रकल्प पर्जन्यछायेच्या, दुष्काळी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रकल्प भरत नाहीत. त्यामुळे मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांच्या तुलनेत लघु प्रकल्पांत पाणीसाठा कमी असतो, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिचंद्र चकोर यांनी दिली.