मुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या बंडखोरीनंतर बंडोबांना थंड करण्यासाठी नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू झाले असले, तरी काही प्रमुख बंडखोर मागे घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. नेतेमंडळींच्या प्रयत्नांना कितपत यश येेईल याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), वंचित बहुजन आघाडीसह छोट्या पक्षांनाही बंडखोरीचा फटका बसला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीतील बंडानंतर उमेदवार व बंडखोरांची संख्या वाढली आहे. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेही वाचा :खासगी वैद्यकीय व दंत महाविद्यालयांना मुक्त फेरीतून वगळले, पुढील प्रवेश संस्थात्मक फेरीतून होणार

भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध नेत्यांकडे त्यासाठी जबाबदारी सोपविली आहे. तसेच काही बंडखोरांशी थेट फडणवीस संपर्क साधत आहेत. काँग्रेसमध्ये राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बंडखोरांशी चर्चा करीत आहेत. शिवसेनेने (ठाकरे) आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. मुंबईत भाजपचे बंडखोर गोपाळ शेट्टी हे लढण्यावर ठाम आहेत. यामुळे भाजप नेत्यांची शिष्टाई यशस्वी होण्याबाबत साशंकता आहे. काँग्रेसमध्ये असाच गोंधळ सुरू आहे. काँग्रेसच्या काही बंडखोरांनी आमची मनधरणी करू नका. अपक्ष म्हणून लढणारच, असे नेतृत्वाच्या कानी घातल्याचे सांगण्यात येते.

महायुतीच्या नेत्यांची बैठक

महायुतीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार काही मतदारसंघांमध्ये परस्परांच्या विरोधात रिंगणात आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बुधवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत कोणत्या मतदारसंघातून कोणी माघार घ्यायची याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सोमवारी माघार घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या बंडखोरीबाबत तिन्ही पक्षांचे नेते आपापल्या पक्षातील नाराजांशी चर्चा करणार आहेत.

हेही वाचा :मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर भुजबळ ठाम

अजित पवार यांच्या पक्षाशी संबंधित नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उमेदवारीवर महायुती कोणता तोडगा काढणार, असा सवाल केला जात आहे. समीर भुजबळ यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दुसरीकडे, नवाब मलिक यांनी शिवाजीनगर-मानखुर्दमधून लढण्याची सारी तयारी केली आहे. समीर भुजबळ यांच्या बंडखोरीमुळेच नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या विरोधात शिंदे गटाने बंडाचे पाऊल उचलले आहे. यातूनच शिंदे व अजित पवार यांच्यात समझोता होणार का, याची उत्सुकता आहे. मतदारसंघ मित्र पक्षाला सोडल्याने आमचे राजकीय भवितव्य काय, असा सवाल बंडखोरांकडून केला जात आहे.