मुंबई: सरकारकडून काही त्रुटी राहिल्यास त्या नजरेस आणून द्या. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण आणाल तर माझ्याकडेही तुमच्या चिठ्ठय़ा- चपाटय़ा आहेत. त्या बाहेर काढण्याची वेळ आणू नका आणि माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विरोधकांना गर्भित इशारा दिला. एवढे बोलूनही हा ‘इशारा’ नाही, असा दावाही त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विरोधकांच्या घोषणाबाजीत आघाडीवर राहणाऱ्या धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही विरोधकांनी आज पुन्हा एकदा सरकारविरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना गर्भित इशारा देताना तुमच्या सोबत काम केले आहे, याची आठवण करून देत आपल्याकडे सगळय़ा चिठ्ठय़ा- चपाटय़ा आहेत याकडे लक्ष वेधले. बदनामीचे राजकारण थांबवा. सत्ताधारी आणि विरोधक ही एकाच रथाची दोन चाके आहेत. काम करीत असताना सरकारकडून काही त्रृटी राहिल्यास त्या नजरेस आणून द्या. आम्ही संवेदनशील आहोत. त्रुटी दूर करू, परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारम्ण आणून टीका करण्यात वेळ घालवू नका. मला कामातून उत्तर द्यायचे आहे. पण सहन करण्यालाही काही मर्यादा असते, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावले.
शिंदेंच्या इशाऱ्यानंतर मुंडे गायब
विरोधकांच्या आंदोलनात अग्रेसर राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना यापुढे ‘करुणा’ दाखविणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिला होता. त्यानंतर मंगळवारी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ केलेल्या सरकारविरोधातील घोषणाबाजी- निदर्शनातून मुंडे गायब झाले होते. विधान भवनाच्या पायऱ्यांवर जेव्हा घोषणाबाजी झाली, त्यातून धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. सभागृहात मात्र मुंडे हे उपस्थित होते.
मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल विरोधकांचा आक्षेप
मुंबई : मंत्री सभागृहात असले पाहिजेत हे तुमचे म्हणणे योग्य आहे. आज जरा समजून घ्या. मी माझ्या भाषेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सांगतो. मग ते उद्यापासून सगळे व्यवस्थित करतील, असे आश्वासन पीठासीन अधिकारी कालिदास कोळंबकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले आणि विधानसभेत हशा उसळला. विधानसभेतील कामकाजात मंगळवारी सकाळपासून मंत्री सभागृहात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधक आक्षेप घेत होते. दुपारी पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा केवळ एकच मंत्री सभागृहात उपस्थित होते याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर इतर मंत्री विधान परिषदेत आहेत असे उत्तर देऊन पीठासीन अधिकारी कालिदास कोळंबकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यास शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. याचा अर्थ विधानसभेतील कामकाजावेळी एकच मंत्री आणि बाकी १९ मंत्री विधान परिषदेत आहेत का, असा सवाल जाधव यांनी केला.