मुंबई : पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २० ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा होता. मात्र वैद्यकीय समुपदेशन फेरीने नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानेही (सीईटी कक्ष) राज्य कोट्यांतर्गत प्रवेशासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर झाली. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ ते २० ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा होता. मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय समुपदेशन समितीने केंद्रीय व राज्य कोट्यातंर्गत प्रवेशाला मुदतवाढ जाहीर केली आहे.
त्यानुसार सीईटी कक्षाने पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीला प्रवेश घेण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. तसेच नव्या वेळापत्रकानुसार पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी शिथिल केलेल्या पात्रता अटीनुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मुक्त फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील २६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पहिली मुक्त फेरी २ सप्टेंबर रोजी, तर दुसरी मुक्त फेरी ५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.