मुंबई : पालघरमध्ये वाढवण बंदरालगत चौथी मुंबई तर अटल सेतूच्या पायथ्याशी तिसरी मुंबई वसविण्यात येणार आहे. ही नवीन शहरे वसविण्यासाठी विकासकांनी राज्य सरकारला सहाकार्य करावे. त्यांना आवश्यक ती मदत सरकार करेल. दोघांच्या सहकार्याने एमएमआरमध्ये येत्या १० वर्षांत दुबईपेक्षाही सुंदर असे मोठे शहर वसवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुल येथील क्रेडाय-एमसीएचआय आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील पहिले सर्वात मोठे आणि जगातील पहिल्या १० क्रमांकात मोडणारे बंदर वाढवण येथे उभारले जाणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तर या बंदरामुळे विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. या बंदराशी एमएमआरला जोडण्यासाठी उत्तन – विरार सागरी सेतूचा विस्तार विरार ते पालघर, वाढवण बंदर असा केला जाणार आहे. त्यामुळे वाढवण बंदरावर पोहचणे सोपे होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या बंदरामुळे निर्माण होणाऱ्या संधी लक्षात घेता वाढवण बंदरालगत चौथी मुंबई वसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून चौथी मुंबई वसवली जाणार आहे. तर दुसरीकडे अटल सेतूमुळे मुंबईतून नवी मुंबईत, तसेच नवी मुंबई विमानतळावर अवघ्या काही मिनिटांत पोहचणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे अटल सेतू प्रभावित क्षेत्रात निर्माण होणारी संधी लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून तिसरी मुंबई वसविण्यात येत आहे. या चौथ्या आणि तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून एक चांगले शहर वसविण्यासाठी क्रेडाय-एमसीएचआयमधील विकासकांनी सरकारला सहकार्य करावे. तिसऱ्या मुंबईसाठी तुम्ही पुढे आलात, तर एमएमआरडीए आणि विकासक यांच्या संयुक्त भागिदारीतून तिसरी मुंबई वसविणे सोपे होईल. विकासकाला २४ टक्के, तर एमएमआरडीएला ७६ टक्के हिस्सा देण्यात येईल. सरकार परवनाग्या, भूसंपादनासाठी आवश्यक मदत करेल. ही संधी आहे, तुम्ही पुढे या आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे अगदी दुबईपेक्षाही सुंदर आणि मोठे शहर वसवू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यामुळे चौथी आणि तिसरी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र होणार आहे. त्याचबरोबर एमएमआरमध्ये सागरी मार्ग, सागरी सेतू, भुयारी मार्ग, मेट्रो अशा अनेक प्रकल्पांमुळेही एमएमआरमध्ये विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत. जेव्हा भारताची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डाॅलर्स बनविण्याचा विषय येतो तेव्हा यात महाराष्ट्राचा हिस्सा १ लाख कोटी डॉलर्स असेल असे म्हटले जाते. पण केवळ एमएमआरची क्षमता १.५ लाख कोटी डाॅलर्स अर्थव्यवस्थेची आहे, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. नव्या विचारांने, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हे करू शकतो, तसा संकल्प आपण आज करू या, असेही ते म्हणाले.