मुंबई: विरोधकांना निवडणुका आताच घेतल्या तर पराजयाला सामोरे जावे लागेल अशी शंका वाटत आहे. त्यांना निवडणुका अडचणीच्या वाटत आहेत. त्यामुळे सहा महिने निवडणुका पुढे गेल्या तर बरे होईल, असे त्यांचे मत आहे. म्हणून मतदार याद्यांचे कारण पुढे केले जात आहे. मात्र आम्हीही तयारी केली आहे, विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून लोकसभा निवडणूक काळात त्यांना ज्या मतदारसंघात लाभ झाला तेथील मतदारयाद्यांतील घोळ पुराव्यांसह जनतेसमोर आणू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त आयोजित पत्रकार स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात औपचारिक गप्पांतून मतदारयांद्यांवर आपली भूमिका मांडली. मतदार याद्यांत सुधारणा व्हावी ही माझीही भूमिका आहे. त्यासाठी याआधीच मी निवडणूक आयोगाकडे गेलो असल्याचे फडणवीसांनी सांगितले. विरोधक मतदारयाद्यांबाबत जो कांगावा करीत आहेत तो निरर्थक आहे. ज्यावेळी प्रारूप याद्या येतात त्यावेळी निवडणूक आयोगाकडून त्या अंतिम करण्यापूर्वी हरकती व सूचना मागविल्या जातात. त्यावेळीच त्यांनी निवडणूक आयोगाला हरकती-सचूना नोंदवून का विचारले नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला.
विरोधकांकडून खोटा प्रचार सुरू असून मतदारयाद्यांमध्ये काही ठिकाणी त्याच त्याच नावांची पुनरावृत्ती झाली असू शकते, मात्र त्या याद्यांमधील अशा मतदारांनी दोन किंवा तीन ठिकाणी मतदान केले असेल तर ते चुकीचे मानले जाईल. पण जर एकाच ठिकाणी मतदान झाले असेल तर ते बोगस कसे म्हणणार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीतही विरोधकांकडून मतदारयाद्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र पुढे राहुल गांधी यांनी स्वत: व इतर काँग्रेस नेत्यांनी हा मुद्दा सोडून अन्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. कारण हा मुद्दा मांडून मते मिळणार नाहीत. हे वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हा मुद्दा त्या निवडणुकीत पुन्हा चर्चेला आणला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्य निवडणुका या वेळापत्रकानुसारच होतील. पहिल्यांदा नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईत युती, ठाण्यातील युती एकनाथ शिंदेंना विचारून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील युतीबाबतही यावेळी भूमिका स्पष्ट केली. आम्ही तिघांनीही मिळून असा निर्णंय घेतला आहे की ज्या ठिकाणी तिघांचीही ताकद आहे. त्या ठिकाणी एकत्र लढून काहीही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी स्वतंत्रच लढले पाहिजे. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. या ठिकाणी १०० हून अधिक जागा मिळतील व बहुमताचा आकडा आम्ही निश्चित पार करू, महापौर महायुतीचाच बसेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबई वगळता अन्य महापालिका जसे ठाणे आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले युतीत लढू तर युतीत अन्यथा स्वतंत्र निवडणुकांना सामोरे जावू, मीरा भाईंदर महापलिकेबाबतही आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्र निवडणूक लढवू. निवडणुकीनंतर मात्र आम्ही युती करू कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना फायदा होऊ देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुढील आठवड्यापर्यंत सर्व आपत्तीग्रस्त शेकऱ्यांना मदत पोहोचेल
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी ६०-६५ टक्के शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना मदत पोहोचेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मंत्रिमंडळात फेरबदल नाही
गुजरातमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी राज्यात सध्या तरी मंत्रिमंडळात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मंत्रीमंडळाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून फेरबदलाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.