मुंबई : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेतेमंडळींशी दूरध्वनीवर संपर्क साधला. महाविकास आघाडी मात्र दोन्ही पोटनिवडणुका लढविण्यावर ठाम आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले. आमदाराच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महाराष्ट्राची उच्च परंपरा आहे. त्या दृष्टीने मी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला केले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आताही पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्या, असे आवाहन राज यांनी महाविकास आघाडीला केले आहे. जो उमदेपणा भाजपच्या नेत्यांनी दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे, हे देशाला दाखवून देण्याची हीच संधी आहे. अशा दु:खद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात, अशी इच्छा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
‘उद्धव ठाकरेंशी संपर्क साधलेला नाही’
मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या नेत्यांना पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले असले तरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधलेला नाही आणि तो होणारही नाही. महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवावी ही जनतेची इच्छा आहे, आम्ही लढणारच. कसब्यातून काँग्रेस लढणार असून चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छुक आहे. मात्र नेते याबाबत चर्चा करून निर्णय घेतील, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. अंधेरी पोटनिवडणुकीचा अपवाद केला, तरी पंढरपूर, कोल्हापूर आणि नांदेडला पोटनिवडणूक झाली होती याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.
मविआ दोन्ही जागा जिंकेल : राऊत
राजकारणातील कटुता संपविण्याबाबत मी पुढाकार घेईन, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र तसे प्रयत्न अद्याप सुरू झाल्याचे दिसत नाहीत, असा टोला शिवसेना खासदार संयज राऊत यांनी लगावला आहे. राज्यातील वातावरण सरकारला अनुकूल नाही. त्यामुळे महाविकास आघाडी दोन्ही जागा जिंकेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.