मुंबई:  कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी कुपवाडा येथे व्यक्त केला.

पुतळा अनावरणाच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला. ‘आम्ही पुणेकर’ संस्था आणि ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> ‘एअर इंडिया’ची इमारत लवकरच राज्य सरकारकडे; मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाडय़ात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हे स्मारक जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनेल. हे स्मारक महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

 महाराजांच्या नावातच शक्ती आहे, ऊर्जा आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी या वेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांकडून जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुतळा अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी मराठा बटालियन असल्याने शिंदे यांनी जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला. त्यांच्याबरोबर फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.