मुंबई : नोव्हेंबर महिन्यात राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परिणामी, राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी असेल. याचबरोबर देशातील अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यातील कमाल, किमान तापमान आणि पाऊस याचा अंदाज वर्तविण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी नोव्हेंबरचा अंदाज सादर केला. यावेळी नोव्हेंबर महिन्यात वायव्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात देशातील अनेक भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण भारतातील राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदा या भागात ७७ ते १२३ टक्के पाऊस म्हणजेच सरासरीइतका समजला जातो. दरम्यान, राज्यात किमान तापमान अधिक राहणार असल्याने नोव्हेंबर महिन्यात फारशी थंडी पडणार नाही. याचबरोबर राज्यासह मध्य भारत, वायव्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबरमध्ये ७७.७ मिमी पावसाची नोंद
ऑक्टोबर महिन्यात राज्यात सर्वदूर पाऊस पडला. राज्यात १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ७७.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ५ टक्के अधिक पाऊस पडला. कोकण वगळता इतर भागात सरासरी इतकी नोंद झाली. कोकणात मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. याचबरोबर तापमानाचा पाराही चढाच होता.
चक्रीवादळ
यंदा ऑक्टोबर महिन्यात लागोपाठ दोन चक्रीवादळे निर्माण झाली. अरबी समुद्रात तयार झालेले ‘शक्ती’ आणि बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ ही दोन चक्रीवादळे तयार झाली होती. ऑक्टोबर महिन्यात दोन चक्रीवादळांबरोबरच दोन तीव्र कमी दाब प्रणाली तयार झाल्या होत्या. या प्रणालीमुळे राज्यात पाऊस पडला.
मुंबईत पावसाची हजेरी
गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि त्यानंतर सायंकाळी पाऊस असे काहीसे वातावरण सध्या मुंबईत आहे. दरम्यान, शनिवारी पहाटेपासून मुंबई शहर तसेच उपनगरात पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.