मुंबई : सर्व समावेशक पीकविमा योजनेंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित ३७९ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२४ च्या विमा हप्त्यासाठी तब्बल १०२८.९७ कोटी रुपयांचा निधी देण्यास तत्काळ मंजुरी देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

खरीप हंगाम २०२४ साठी आतापर्यंत ३९०७.४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यासाठीचे ३५६१.०८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाई पोटी ३४६.३६ कोटी रुपयांची भरपाई प्रलंबित होती. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने या बाबत प्रशासकीय पातळीवर आढावा घेऊन संबंधित प्रस्ताव वित्त विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता.

या प्रस्तावास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून राज्य विमा हप्त्याचे १०२८.९७ कोटी रुपये मंजूर केल्यामुळे केंद्र सरकारच्या पीकविमा पोर्टलद्वारे सदर कार्यवाही पूर्ण होऊन प्रलंबित भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०२८.९७ कोटी रुपयांचा शासन निर्णय निघाला

राज्य सरकारकडून हप्त्यापोटी देय असलेली रक्कम थकल्यामुळे शेतकऱ्यांना २०२३-२४ मधील पीकविमा नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाला होता. त्यामुळे सरकारची कोंडी झाली होती. त्यामुळे वित्त विभागाने राज्य सरकारच्या हप्त्याला तत्काळ मंजुरी दिली. निधी मंजुरीचा शासन आदेशही बुधवारी जारी करण्यात आला आहे.