मुंबई : राज्यातील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा सोमवारी मुंबईतील रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. मुंबई महानगरपालिका व राज्य सरकारने आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची बाह्यरुग्ण विभागांमध्ये नियुक्ती केल्याने रुग्ण सेवा बाधित झाली नाही. तसेच प्रसार माध्यमातून नागरिकांना आंदोलनाची माहिती मिळाल्याने रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही काही अंशी घट झाल्याचे निदर्शनास आले.

फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने राज्यातील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि आंतरवासिता करणारे डॉक्टर सहभागी झाले असून, त्यांनी बाह्यरुग्ण विभागातील सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांतील आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व रुग्णालय प्रशासनांनी प्राध्यापक, सहयोगी, सहाय्यक प्राध्यापकांची बाह्यरुग्ण विभागामध्ये नियुक्ती केली होती. परिणामी, रुग्ण सेवा फारशी बाधित झाली नाही. डॉक्टरांचा बंद असल्याने रुग्णांची गर्दी काही प्रमाणात कमी होती. डॉक्टरांच्या संघटनेने आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गंभीर स्थितीत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.

बाह्यरुग्ण विभागांमध्ये वरिष्ठ डॉक्टरांची नेमणूक केल्याने रुग्ण सेवा सुरळीत सुरू आहे. आंदोलनादरम्यान फक्त बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवण्यात आली असून, शस्त्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.

रुग्णांना शस्तक्रियेनंतरच्या आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक असते. त्यामुळे आवश्यक तेवढ्याच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण कोणतीही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. अती विशेषोपचार डॉक्टर संपामध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. जे. जे. रुग्णालयामधील बाह्यरुग्ण विभागांमध्ये वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती केल्याने रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.