मुंबई : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीविरोधात गुरूवारी डॉक्टरांनी संप पुकारला असून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि महाराष्ट्र सिनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनने (एमएसआरडीए) या दोन संघटनाही संपावर जाणार असल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सीसीएमपी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील डॉक्टरांनी दंड थोपटले आहेत. आयएमएने १८ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या संपामध्ये राज्यातील सरकारी रुग्णालयातील एमएसआरडीए या डॉक्टरांच्या संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्डने सुद्धा या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील जे.जे. रुग्णालय, केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयातील आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

कायद्यानुसार राज्य सरकारचा निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे. या दोन्ही व्यवसायासाठीचे शिक्षण, प्रवेश परीक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे समान दर्जा देणे चुकीचे असून त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. संप काळात सरकारी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत.

मात्र रुग्णसेवा फारशी बाधित होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास त्याविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मार्डचे राज्य प्रवक्ता डॉक्टर अर्थव शिंदे यांनी दिली. यामुळे १८ सप्टेंबर रोजी राज्यातील रुग्णसेवा बाधित होऊन आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयएमएचे ५२ हजार डॉक्टर संपात सहभागी

राज्यात जवळपास १९ हजार रुग्णालयांमध्ये आयएमएशी संलग्न ५२ हजार डॉक्टर कार्यरत आहेत. हे सर्व डॉक्टर १८ सप्टेंबर रोजी संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असतील, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिली.

संपकरी डॉक्टरांचे वेतन कापणार

मार्डने संप पुकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी तातडीने मुंबईतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांची बैठक घेतली. या बैठकीत रुग्णसेवा बाधित होणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच गुरूवारी सर्व निवासी डॉक्टरांच्या पाळ्या लावण्यात याव्यात. कर्तव्यावर उपस्थित न राहणाऱ्या निवासी डॉक्टरांचे त्या दिवसाचे वेतन कापण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

सचिवांची संप न करण्याची सूचना

केंद्रीय मार्डने संपासंदर्भातील पत्र देण्यासाठी बुधवारी सायंकाळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांची बैठक घेतली. यावेळी मार्डच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवून त्यावर मुख्य न्यायाधीशांसह चर्चा करून मार्ग काढण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. तसेच होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी देण्यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याबाबत विनंती करण्यात येईल, असे सांगून त्यांनी मार्डच्या पदाधिकाऱ्यांना संप न करण्याची विनंती केली.