मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या बीएससी नर्सिंग प्रवेशानंतर आता राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम) या अभ्यासक्रमांची प्रवेश फेरी नोंदणी प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) सुरू केली आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जीएनएम) अभ्यासक्रम राबवले जातात. परिचारिका क्षेत्रातील जीएनएम अभ्यासक्रम हा अधिक व्यापक आणि मूलभूत आरोग्य सेवा कौशल्यांसाठी आवश्यक असतो. या अभ्यासक्रमासाठी राज्यातील ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार, मालेगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशीव, वाशिम, अमरावती, स्त्री रुग्णालय अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये या अभ्यासक्रमाच्या ९६० जागा उपलब्ध आहेत.
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जीएनएम अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षामार्फत राबवण्यात येते. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची सीईटी ७ आणि ८ एप्रिल रोजी झाली होती. या परीक्षेचा निकाल १५ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज दाखल करू शकतात.
यंदा या अभ्यासक्रमांसाठी झालेल्या प्रवेश परीक्षेनंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्यासाठी १९ जुलैपर्यंतची मुदत आहे. या मुदतीत ऑनलाइन प्रवेश शुल्क भरण्यापासून कागदपत्रे सादर करण्यापर्यंतची प्रक्रियाही उमेदवारांना पार पाडायची आहे. त्यानंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. जीएनएम अभ्यासक्रमासाठी १० हजार ५५० रुपये एवढे वार्षिक शुल्क आकारण्यात येईल, अशी माहितीही सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.