मुंबई: विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केले.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात पवार बोलत होते. यावेळी पवार यांच्या हस्ते राज्यातील १११ गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे सदिच्छादूत असल्याचे सांगत पवार यांनी बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज यावेळी अधोरेखित केली. पूर्वी साक्षर-अनाक्षर यावर भर होता, नंतर संगणक साक्षरतेचा काळ आला. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग आहे. यामुळे प्रत्येकाने एआय साक्षर होणे, डिजिटल शिक्षण पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वत:ला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. शिक्षक पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा कृतज्ञतेने उल्लेख करुन भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिनाच्या दिवशीच (५ सप्टेंबर) पुरस्कार वितरण व्हावे, अशी सूचना पवार यांनी केली.

शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी- मुख्यमंत्री

शिक्षक केवळ पुस्तकातील धडा शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. आत्मविश्वास, संस्कार आणि प्रामाणिकपणाची बीजे त्यांच्या मनात पेरतात. शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

पुढील वर्षापासून कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातील, असे दादाजी भुसे यांनी यावेळी जाहीर केले.

शब्द घडवतो विचार, विचार घडवतो माणूस आणि माणूस घडवतो देश. या प्रवासाची सुरुवात शिक्षकांकडून होते आणि म्हणूनच शिक्षक हे समाज व राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. शाळा बदलते पण त्यासाठी एक जिद्दी शिक्षक लागतो अशा शब्दात भुसे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.