मुंबई : आागामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी मदत पॅकेजमध्ये जास्तीत जास्त तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातूनच पुराचा फटका बसला नाही अशा काही तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे ३१ जिल्हयांतील २५३ तालुके बाधित झाल्याची घोषणा सरकारने केली असून या तालुक्यातील बाधितांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. रायगडमधील सर्व तालुक्यांना स्थान मिळाले आहे. काही जिल्ह्यांमधील तालुक्यांना पुराचा एवढा फटका बसलेला नसला तरी त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
मदतीची रक्कम बाधितांच्या खात्यात तातडीने मदत जमा करण्याचे आदेश सबंधित विभागांना देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून राज्यातील २५३ तालुके अतिवृष्टी आणि पूरामुळे बाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळासाठी लागू असलेल्या सर्व सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, मालमत्तेचे नुकसान झालेल्यांना मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीशिवाय आता शेतजमीनीवरील गाळ काढण्यासाठी हेक्टरी १८ हजार रुपये देण्यात येणार असून दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे आणि नदीपात्र, प्रवाह बदलल्यामुळे शेत जमीन वाहून जाणे यासाठी केवळ अत्यल्प भूधाकरक म्हणजे १ हेक्टरपेक्षा कमी जमीनधारक आणि अल्पभूधारक म्हणजेच एक ते दोन हेक्टरच्या दरम्यान जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच प्रतिहेक्टर ४७ हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती व जाळी यासाठी मदत देण्यात येणार असून पूर्ण नष्ट झालेल्या बोटींसाठी १५ हजार, अशंत
या तालुक्यांमध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, परिक्षा शुल्कात माफी आणि इयत्ता १० वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी फी माफी आदी सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
मदत वाटप करतांना कृषी विभागाने रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते आणि बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी १० रुपये याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावेत. अशाच प्रकारे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रोजगार हमी योजना विभागांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
पात्र लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक करण्याचे आदेश
या मदत पॅकेज अंतर्गत लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा. तसेच या यादया तालुका आणि गावातही प्रसिद्ध कराव्यात. त्यामुळे या मदतवाटपातील गोंधळ टळेल आणि पात्र लोकांनाच मदत मिळेल.
जिल्हानिहाय तालुके
नाशिक (१५), यवतमाळ (१२), अमरावती (६). वाशिम (३), बुलढाणा (९), अकोला (५), चंद्रपूर (१४), वर्धा (७), नागपूर (१२), भंडारा (६), गोंदिया (७), गडचिरोली (१०), सोलापूर (११), अहिल्यानगर (१३), पुणे (७), कोल्हापूर (३), सातारा (३), सांगली (८), जळगाव (४), नंदुरबार (६), धाराशिव(८), लातूर (१०), परभणी (९), हिंगोली (३), छत्रपती संभाजीनगर (९), जालना (८), बीड (११), रायगड (१५), रत्नागिरी (७), ठाणे (५), पालघर (७)