मुंबई : राज्य सरकारच्या आपत्ती व पुनर्वसन विभागाने सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी ९१३ कोटी ४१ लाख १६ हजार रुपयांचा मदत निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात राज्य सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यापोटी छत्रपती, संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ९१३ कोटी ४१ लाख १६ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात मंजुरी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ लाख ४४ हजार ६४९ शेतकऱ्यांची ५ लाख १९ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, त्यापोटी ४८०.१७ कोटी रुपये वितरीत केले जाणार आहेत. जालन्यात ५ लाख ४५ हजार ८९० शेतकऱ्यांची ३ लाख ८० हजार २६३ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, नुकसानीपोटी ३५६.६६ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे. वर्धा जिल्ह्यात ७२ हजार २६० शेतकऱ्यांची ८९ हजार ९८३.३९ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्यापोटी ७६.५७ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे.

निधी तत्काळ वितरणाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यासाठी ९१३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी तत्काळ वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.