मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानातील तयारी जोरात सुरू असली तरी, नव्या मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी कायम आहे. ‘मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको’ अशी ठाम भूमिका घेत भाजपने शिवसेनेने पाठवलेल्या यादीतील काही नावे फेटाळून लावली आहेत. त्यामुळे ‘आमच्या मंत्र्यांची नावेही भाजपच ठरवणार का’ असा संतप्त सवाल शिंदे गटातून उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी सायंकाळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीतही चर्चा झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री पद मिळणार नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर शिंदे यांनी गृहखात्याचा आग्रह धरला आहे. मात्र, त्यालाही भाजपने विरोध केला. त्यातच शिंदे यांच्या आजारपणामुळे महायुतीतील चर्चा पुढे सरकू शकली नव्हती. शिंदे यांनी मंगळवारी वर्षा निवासस्थान गाठल्यानंतर चर्चेला वेग आला. मुख्यमंत्र्यांसह २१-२२ मंत्री पहिल्या टप्प्यात गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानात होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेणार असून महायुतीतील तीनही पक्षांचे प्रत्येकी सात मंत्र्यांचा त्यात समावेश असण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या सात नावांची यादी पाठविली होती. पण भाजपने संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसा निरोप मंगळवारी गिरीश महाजनांमार्फत शिंदे यांना पोहोचवण्यात आला. त्यानंतर सायंकाळी स्वत: फडणवीस शिंदेंना भेटण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर गेले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अधिकृतपणे समजू शकलेला नाही. मात्र, चर्चेचा मुद्दा मंत्र्यांची नावे आणि खाती हाच असल्याचे समजते.

हेही वाचा >>> मोठी बातमी! सत्तास्थापनेचा तिढा सुटणार? देवेंद्र फडणवीस तातडीने ‘वर्षा’वर एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बैठकीत काय निर्णय होणार?

आधीच्या मंत्रिमंडळातील सुमार कामगिरी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करता येणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवालही फडणवीस यांनी शिंदेंकडून मागितला आणि तो पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. शिवसेनेतील मंत्र्यांची नावेही भाजपच निश्चित करीत असल्याने शिंदे यांचा त्यास आक्षेप आहे.

राष्ट्रवादीलाही हाच निकष?

मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको, अशी भूमिका भाजपने घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोरही पेच आहे. पक्षाचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांच्या निवडीबाबत काय भूमिका भाजप घेईल, याचीही उत्कंठा आहे. सत्तावाटपात राष्ट्रवादीला चांगली खाती मिळावीत यासाठी अजित पवार हे गेले दोन दिवस नवी दिल्लीत होते. अजित पवार यांना अर्थ खाते मिळणार आहेत. तसे संकेत त्यांनी स्वत:च दिले आहेत. याशिवाय कृषी, सहकार, महिला ब बालकल्याण, आरोग्य, सामाजिक न्याय अशी महत्त्वाची खाती मिळावीत, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

खात्यांसाठी आग्रह कायम

गृह, महसूल, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य यासह महत्वाची खाती आणि केंद्रातही आणखी एका मंत्रिपदाची मागणी शिवसेनेने केली आहे. विधानपरिषद सभापतीपद मिळत नसेल, तर त्याबदल्यात एखादे खाते किंवा मंत्रीपद शिवसेनेला हवे आहे. भाजप २०, शिवसेना (एकनाथ शिंदे) १२ व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ९ असे मंत्रिपदांचे वाटप होण्याची शक्यता असली तरी पवार यांनीही ११ मंत्रिपदांचा आग्रह धरला आहे.

आज निवड

भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात आज, बुधवारी सकाळी दहा वाजता होईल. यावेळी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित राहतील. पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याने देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चिात मानली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही मंत्रीपदासाठी अडून बसलेलो नाही. शिंदे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केले आहे. त्यांना कोणतेही मंत्रिपद मिळाले तरी ते ‘कॉमन मॅन’ म्हणूनच काम करणार आहेत. मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नकोत, यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. तसेच प्रगती पुस्तक तपासूनच पुन्हा मंत्रीपदे दिली जाणार आहेत. – किरण पावसकर, शिंदे गटाचे नेते