मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारच्या काळात रखडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदानच न मिळाल्याने १८०० केंद्र चालकांनी ठिकठिकाणी उपोषण करीत निदर्शने केली. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोरही निदर्शने करण्यात आली. अखेर या शिवभाेजन केंद्र चालकांचे थकलेले दोनशे कोटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यभरात १८०० शिवभोजन थाळी केंद्रे आहेत. कोरोनाकाळात १० रुपयांत मिळणाऱ्या या शिवभोजन थाळी केंद्रांचा गरीब गरजू नागरिक, बांधकाम मजुरांना या थाळीचा मोठा आधार मिळाला. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ही योजना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दरवर्षी अर्थसंकल्पात २७० कोटींची तरतूद करण्यात येत होती. मात्र महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठीच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाल्याने या योजनेकडे दुर्लक्ष झाले.
ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असून काही केंद्र चालकांना डिसेंबरपासून तर काही केंद्र चालकांना फेब्रुवारीपासून अनुदान मिळालेले नाही. या शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे सुमारे २०० कोटी रुपये सरकारकडे थकीत राहिल्याने केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले. केंद्रचालकांनी ‘शिवभोजन संघटना’ स्थापन केली. सात महिन्यांपासूनची थकित बिले मिळालीच पाहिजेत अशी मागणी करीत या केंद्र चालकांनी सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर जोरदार आंदाेलन करण्याचा इशारा दिला.
केंद्र चालविण्यासाठी द्यावे लागणारे जागेचे भाडे, कामगारांचे पगार, किराणामालाचे थकलेले बिल यामुळे केंद्र चालविण्यात अडचणी निर्माण झाल्याचे पत्र या केंद्र चालकांकडून सरकारला देण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांना निवेदन देऊनही सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे केंद्र चालकांचे म्हणणे होते. या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीत आज चर्चा करण्यात आली. त्यानुसार केंद्र चालकांचे थकलेले बिल देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे या केंद्र चालकांच्या थकलेल्या अनुदानाविषयी सरकारकडून तत्काळ तजवीज केली जाणार आहे.
सरकारकडून अर्थसंकल्पात शिवभाेजन थाळी योजनेसाठी २७० कोटींची आवश्यकता आहे. मात्र यंदा केवळ ७० कोटींची तरतूद करण्यात आली असून मात्र त्यापैकी केवळ २० कोटी रुपयांचेच वितरण झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्यभरात दररोज अडीच लाख गरजूंना दहा रुपयांत थाळी दिली जाते.