मुंबई: ‘हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून मंत्रालय हे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार राज्यातील जनतेला देत आहेत. तरी त्यांच्याच प्रशासनाच्या एका फतव्यामुळे मंत्रालयात प्रवेशासाठी सामान्य जनतेला तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. आता एकच प्रवेशद्वार सामान्यांसाठी आहे.

 प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आशेने सरकारकडे धाव घेणाऱ्या लोकांना सुरक्षाव्यवस्थेचे अडथळे पार करताना कसरत करावी लागत आहे. परिणामी मंत्रालयात आमची कामे कशी मार्गी लागणार, असा उद्विग्न सवाल अभ्यागतांकडून केला जात आहे. कितीही लोक आले तरी त्यांना सहज भेटणे, त्यांची गाऱ्हाणी ऐकूण घेणे त्याची तेथेच सोडवणूक करण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या कारभारामुळे मंत्रालयाचा सहावा मजला नेहमीच गजबजलेला असतो. तक्रार किंवा कामासाठी मंत्रालयात दररोज साधारणत: तीन ते चार हजार तर मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी पाच ते सहा हजार अभ्यागत येतात.

हेही वाचा >>> मुंबई: धुळीच्या बंदोबस्तासाठी शिवाजी पार्क मैदानात पाणी फवारणी

कामे कशी होणार?

मंत्रालयातील गर्दीवर उपाययोजना करताना, गृह विभागाने लागू केलेली नवी नियमावली आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सर्वसामान्यांसाठीचे जनताजनार्दन प्रवेशद्वार आता केवळ मंत्र्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. तर सनदी अधिकाऱ्यांचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठीच राखीव आले आहे. तर गार्डन प्रवेशद्वारावरूनच आमदार आणि अभ्यागतांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रवेशद्वारावर गर्दी उसळत असून अभ्यागतांना प्रवेशिका मिळविण्यासाठी एकदा रांग लावल्यानंतर पुन्हा मंत्रालय प्रवेशासाठी वेगळी रांग लावावी लागते. त्यातून आधी प्रवेशिका आणि नंतर सुरक्षा तपासणी असे सोपस्कार पूर्ण करतांना लोकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागते. आम्ही तासंतास रांगेत उभे असतो. मात्र लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते,  विकासक अशा मोठय़ा लोकांना अने्क वेळा प्राधान्याने प्रवेश देताना आम्हाला थांबविले जाते. दुपारी दोन वाजता येऊनही पाचच्या सुमारास मंत्र्यालयात प्रवेश मिळतो. मग आम्ही मंत्री, अधिकाऱ्यांना केव्हा भेटायचे आणि कामे कशी करून घ्यायची, असा सवाल अभ्यागतांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठांचा आदेश आहे, आम्ही काय करणार, असे पोलिसांचे प्रत्युत्तर असते.