महाराष्ट्र सरकार आणि इस्त्रायल या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक विकसित करण्यासाठी आणि भविष्यात महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टीने शिक्षण खाते आणि इस्त्रायल भविष्यात विशिष्ट पाच स्तरांवर काम करतील, असा निर्णय राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि इस्त्रायल दूतावासातील उच्च अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
महाराष्ट्रातील शिक्षण पद्धत अधिक प्रगत करण्यासाठी इस्त्रायलमधील शिक्षण पद्धतीचे कशा प्रकारे सहकार्य घेता येईल, यांसदर्भातील एक बैठक सोमवारी झाली. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयामध्ये झालेल्या बैठकीप्रसंगी विनोद तावडे यांच्यासह इस्त्रायलचे मुंबईमधील दूतावासातील कॉन्सुलेट जनरल जोनाथन मिलर, माशाव या इस्त्रायलच्या शिक्षण मंडळाचे उपमुख्य अधिकारी इलायन फ्लुस, माशावचे दिल्लीमधील अधिकारी डॅन अल्लुफ, उप कॉन्सुलेट मॅटन झामी, साठ्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कविता रेगे आदी उपस्थित होते.
सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था तसचे इस्त्रायलमधील प्रचलित शिक्षण पद्धती, इस्त्रायलमधील शाळांमध्ये दिले जाणारे सैनिकी शिक्षण, तेथील शिक्षक प्रशिक्षण पद्धती आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत मान्यवरांनी आपली मते मांडताना महाराष्ट्रातील शिक्षण अधिक प्रगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
विनोद तावडे यांनी या चर्चेच्या अनुषंगाने इस्त्रायलमधील शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीमध्ये सुरु करताना प्रामुख्याने पाच स्तरांवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. महाराष्ट्रामधील ग्रामीण भागात शाळांधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण काहीसे चिंताजनक आहे, त्यामुळे या विषयाकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील शिक्षकांना खास प्रशिक्षण देण्याची गरज आहे, त्यामुळे ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स हा उपक्रम सुरु करायची आवश्यकता आहे. राज्यातील शिक्षक हे चांगल्य दर्जाचे आहेत, त्यामुळे शिक्षकांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना अधिक प्रगत करता यईल. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, या शिक्षकांचे शिक्षणाबरोबर व्यावसायिक विकास व्हावा, हा उद्देश असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.