मुंबई : गर्भश्रीमंत महामंडळ असा लौकिक असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तोट्यात गेले आहे, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली. नाईक यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नाही, त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, सभापतींनी या बाबत आपल्या माझ्या दालनात बैठक घेण्यात येईल, असे जाहीर केले.
शशिकांत शिंदे यांनी एमआयडीसीच्या अर्थसंकल्पात तूट नोंदविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर दोन वर्षांपूर्वी फायद्यात असलेले महामंडळ आता तोट्यात का गेले, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
जमीन अधिग्रहण, पाणी वापर करासह अन्य कारणांमुळे एमआयडीसीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १४१६.८२ कोटींचा तोटा झाला आहे. हा तोटा जास्त नाही, तोटा भरून काढण्याचे उपाययोजले जात असल्याची माहिती इंद्रनील नाईक यांनी दिली. पण, नाईक यांच्या उत्तरावर शिंदे यांनी आक्षेप घेतला. शेतकऱ्यांकडून घेतलेली जमीन वाढीव दराने उद्योगांना दिली जाते. पाणीपट्टी उद्योगांकडून वसूल केली जाते. तरीही महामंडळाला तोटा का झाला, असा प्रतिप्रश्न केला.
या चर्चेत अंबादास दानवे यांनी हस्तक्षेप करीत महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गरज नसताना अनेक एमआयडीसी क्षेत्रात भूखंड माफियांच्या सांगण्यावरून जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. आता या भूखडांना मागणी नाही. त्याचा आर्थिक भार महामंडळावर पडला आहे, असा आरोप दानवे यांनी केला. मंत्री नाईक यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नाही, हा प्रश्न राखून ठेवा, अशी मागणी केली. सभापती प्रा. राम शिंदे यांनी या बाबत माझ्या दालनात बैठक होईल, असे जाहीर केले.