मुंबई : युवा रंगकर्मींच्या दर्जेदार सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद आणि अरे. . . आवाज कुणाचा अशा आरोळ्यांनी दणाणलेले नाट्यगृह, उत्कृष्ट सादरकरण आणि विषय वैविध्य यांनी नटलेल्या लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत यंदा कोल्हापूर विभागाने आपली मोहोर उमटवली आहे. सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनय या वैयक्तिक पारितोषिकांसह राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘व्हाय नॉट?’ या एकांकिकेने महाराष्ट्राची लोकांकिका होण्याचा बहुमान पटकावला.

देवगड येथील श्री. स. ह .केळकर महाविद्यालयाची ‘मशाल’ या एकांकिकेने द्वितीय तर पुण्यातील आयएमसीसी महाविद्यालयाची ‘सखा’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. युवा रंगकर्मींच्या सळसळत्या उत्साहात आणि मनोरंजनसृष्टीतील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत महाअंतिम फेरी शनिवार, २१ डिसेंबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे रंगली. 

हेही वाचा >>>रंगभूमी हेच अभिनयाचे मूळ; अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे ठाम प्रतिपादन

युवा रंगकर्मींमधील कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आणि त्यांना कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेबाबत नाट्यप्रेमींमध्ये सुरुवातीपासूनच उत्साह पाहायला मिळत आहे. यंदा युवा रंगकर्मींचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या रंगमंचीय आविष्काराला दाद देण्यासाठी महाअंतिम फेरीसाठी सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टी गाजवणारे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना महाअंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर परीक्षकांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणचे अध्यक्ष उन्मेष वाघ, सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी, आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून महाअंतिम फेरीची जल्लोषात सुरुवात झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी या आठही विभागांतील एकांकिकांची वैविध्यपूर्ण पर्वणी एकाच ठिकाणी अनुभवण्यासाठी रसिकप्रेक्षकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच यशवंत नाट्य मंदिराबाहेर गर्दी केली होती.

दर्जेदार एकांकिका सादरीकरणाला रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत नाट्यगृह दणाणून सोडले होते. तर निवेदक कुणाल रेगे यांनी आपल्या अनोख्या शैलीत सूत्रसंचालन करीत स्पर्धकांसह रसिकप्रेक्षकांचा उत्साह वाढवला.

हेही वाचा >>>गिरीश महाजन, विखे-पाटील, धनंजय मुंडे यांचे महत्त्व कमी

व्हाय नॉट, मशाल, सखा यांबरोबरच मुंबई विभागातून सिडनहॅम महाविद्यालयाची ’अविघ्नेयाह्ण, ठाणे विभागातून सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालयाची ’कुक्कुरह्ण, नागपूर विभागातून वसंतराव नाईक महाविद्यालयाची ’पासपोर्टह्ण, नाशिक विभागातून नूतन मराठा विद्यालयाची ’सुबन्या आणि…, छत्रपती संभाजीनगर विभागातून देवगिरी महाविद्यालयाची ‘फाटा’ या आठ एकांकिकांचे महाअंतिम फेरीत सादरीकरण झाले. प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, अभिनेत्री व निर्माती मुक्ता बर्वे आणि लेखक व दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी महाअंतिम फेरीच्या परीक्षणाची धुरा सांभाळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’मराठी माणसाच्या जगण्याचा नाटक हा अविभाज्य घटक आहे. विंगेत उभे राहून जो गर्भार अंधार असतो, त्यातून निर्माण होणारी नाट्यनिर्मिती आपण अनुभवत असतो. राज्याच्या विविध भागातील युवा रंगकर्मी हे वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित नावीन्यपूर्ण कलाकृती ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या मंचावर सादर करत असतात आणि महाअंतिम फेरी म्हणजे एक ऊर्जा देणारा दिवस असतो. या स्पर्धेला मनोरंजनसृष्टीतील दिग्गज मंडळी हजेरी लावतात आणि युवा रंगकर्मींना मार्गदर्शनही करतात’, असे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक मांडताना व्यक्त केले.