मुंबई : अमली पदार्थ प्रकणात न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीने सातरस्ता येथील स्थानिक नेत्याला त्याच्या कार्यालयात जाऊन धमकावल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
आर्थर रोड तुरुंगात असलेला आरोपी न्यायालयाच्या सुनावणीनंतर पोलिसांच्या देखरेखीशिवाय बाहेर पडून मटकर यांच्या सातरस्ता येथील जे. आर. बोरिचा मार्गावरील कार्यालयात पोहोचला. मुखवटा घालून आणि मित्राच्या दुचाकीवर मागे बसून आलेल्या आरोपीने, “इथे का बसलाय? ही तुझी जागा नाही. निघून जा, नाहीतर परिणाम भोगशील,” अशी धमकी दिली आणि लगेच पळून गेला. १६ मे रोजी ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मटकर यांनी २१ मे रोजी अग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र याप्रकरणी केवळ अखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले. आरोपीला ४० किलो गांजासह अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालीन कोठडीत आहे. २०१७ मध्ये मटकर यांच्यावर हल्ला झाला होता. आरोपी त्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचा आरोप मटकर यांनी तक्रारीत केला आहे. पण या प्रकारामुळे सुरेक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.