राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर वेगवान घडामोडी घडत आहे. राज्यपालांनी दिलेल्या आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका केली असून त्यावर अद्याप निकाल आलेला नाही. मात्र त्याआधीच भाजपाने बहुमत चाचणीसाठी तयारी करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, उद्या बहुमत चाचणी होण्याची शक्यता असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करुन त्यांच्याकडे मदत मागितली आहे. यावेळी राज ठाकरेंनी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचे आमदार राजू पाटील भाजपाला मतदान करतील असं आश्वासन दिलं आहे. विधानसभेत राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत.
सुप्रीम कोर्टात ५ वाजता सुनावणी
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे. संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दुपारी ३ पर्यंत आम्ही सर्व कागदपत्रं रेकॉर्डवर ठेवू अशी माहिती सुनील प्रभू यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली होती.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केलं. यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला उद्या म्हणजेच गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.