मुंबई : तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाबरोबरच औद्योगिक आंतरवासिता उपलब्ध करून देण्यात येत आहे. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळत आहे, त्यांना प्रशिक्षण देणारे शिक्षक अद्ययावत असणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने पाॅलिटेक्निक संस्थांमधील शिक्षकांचा उद्योजगतातील प्रत्यक्ष अनुभव अद्ययावत असावा यासाठी त्यांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना २७ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर या कालावधीत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देण्याकडे कल वाढला आहे. त्याचवेळी शिक्षकही अद्ययावत होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने पॉलिटेक्निकमधील शिक्षकांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्या अध्यापनात व्यवहार्यता वाढून विद्यार्थ्यांना विषय अधिक सोप्या आणि वास्तवाशी निगडित पद्धतीने शिकवता होईल. औद्योगिक प्रशिक्षणामुळे शिक्षकांमधील कौशल्यवृद्धी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उद्योगाशी जोडलेला हा अनुभव विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठीही उपयुक्त ठरेल. रोजगारासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अंदाज विद्यार्थ्यांना अधिक स्पष्टपणे मिळण्यास मदत होणार आहे.

शिक्षकांना डेटा कम्युनिकेशन, मोबाइल कम्युनिकेशन, स्विचिंग व बेसिक टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्समिशन व एफटीटीएच टेक्नॉलॉजी या दूरसंचार विषयांवरील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पुण्यातील बीएसएनएलच्या झोनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटरमध्ये २७ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. मंडळाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. यात प्रशिक्षणांचा समावेश आहे.

या प्रशिक्षणामुळे पॉलिटेक्निक शिक्षकांना उद्योग क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, पदविका अभ्यासक्रम अधिक परिपूर्ण व व्यवहार्य पद्धतीने शिकवता येणार आहे. प्रत्यक्ष उपकरणे व आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित प्रयोगांचा अनुभव शिक्षकांना मिळाल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचा थेट फायदा होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

चार गटामध्ये होणार प्रशिक्षण

बीएसएनएल झेडटीटीसी, पुणे येथे होणाऱ्या प्रशिक्षणांमध्ये एकूण चार गटांचा समावेश करण्यात आला आहे. २७ ते ३१ ऑक्टोबर रोजी डेटा कम्युनिकेशन या विषयाचे प्रशिक्षण होणार असून, १० ते १४ नोव्हेंबरदरम्यान मोबाइल कम्युनिकेशन, २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान स्विचिंग व बेसिक टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर, ८ ते १२ डिसेंबरदरम्यान ट्रान्समिशन व एफटीटीएच टेक्नॉलॉजी या विषयावर प्रशिक्षण असणार आहे. प्रत्येक गटासाठी ३० जागांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

शिक्षकांसाठी नोंदणी बंधनकारक

राज्यातील पॉलिटेक्निक संस्थांनी शिक्षकांना संबंधित संस्थेच्या प्राचार्यांच्या शिफारशीसह अर्ज करणे बंधनकारक आहे. सहभागी शिक्षकांचे नाव, संस्था कोड, शाखा, पदनाम, ई-मेल व मोबाइल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. सहभागी होणारे शिक्षक मंडळ मान्यताप्राप्त असणे बंधनकारक असल्याचेही एमएसबीटीईने स्पष्ट केले आहे.