पावसाने ओढ दिल्यास पिकाचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरु केली आहे. जूनअखेर आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ात याच्या चाचण्या घेतल्या जाणार असून हे प्रयोग यशस्वी झाल्यास नंतर राबविले जातील, अशी माहिती महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉकेटचा किंवा विमानाचा वापर करुन हा पाऊस पाडला जातो. यामधील तज्ज्ञ आणि हवामान विभागाचे अधिकारी यांच्या मदतीने या चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्यांसाठी सुमारे १० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्यास गरजेनुसार पाऊस पाडला जाईल. त्यासाठी ३० कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. पण चाचण्या यशस्वी न झाल्यास प्रयोग थांबविले जातील, असे खडसे यांनी स्पष्ट केले. पाऊस कमी झाल्यास पिकाला पाणी न मिळाल्याने पेरणी वाया जाते व दुबार पेरणीचे संकट उभे राहते. काही वेळा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची वेळ येते. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली असून निविदाही मागविण्यात आल्या आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अपुरा पाऊस पडणाऱ्या भागांत कोरडे ढग आढळून आल्यास हे प्रयोग केले जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra preparing for artificial rain
First published on: 03-06-2015 at 03:15 IST