मुंबई : गेले काही दिवस विश्रांती घेतलेला मोसमी पाऊस संपूर्ण राज्यात शनिवारपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईतही शनिवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर आज मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर राज्यातील उर्वरित भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर शनिवारपासून पाऊस पुन्हा सुरू झाला. मुंबई शहर तसेच उपनगरात शनिवार मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर आजही कायम राहणार असून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ठाणे शहर आणि परिसरातही मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस शनिवारी झाला.
त्याचबरोबर राज्यातील उर्वरित भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. याचाच प्रभाव म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत शनिवारी सकाळी ८:३० ते शनिवारी मध्यरात्री २:३ पर्यंत झालेली पावसाची नोंद
सांताक्रूझ – ६४.६ मिमी
वांद्रे – ५५.५ मिमी
राम मंदिर – ३८ मिमी
जुहू – ३७ मिमी
टाटा पॉवर चेंबूर – ३६.५ मिमी
कुलाबा – १४ मिमी
भायखळा – १३ मिमी
पावसाचा अंदाज कुठे
मुसळधार पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी.
अतिमुसळधार पाऊस
रायगड.
मेघगर्जनेसह पाऊस
जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव.
विजांसह मुसळधार पाऊस
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.