मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात सक्रीय झालेल्या पावसाने रविवारपर्यंत जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी सकाळपासून सर्वत्र पावसाचा जोर ओसरला. दरम्यान, राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कोकण, विदर्भात पावसाची अधूनमधून शक्यता आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील.
राज्यातील सर्व भागात मागील संपूर्ण आठवडा मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईतही पावसाचा जोर वाढला होता. संततधार पावसामुळे मुंबईकारांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता मुंबईतही पावसाची फारशी शक्यता नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळपासून राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता पुढील काही दिवस तरी नसल्याचा अंदाज आहे. कोकणातील काही भागात मात्र मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीसही मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. साधारण १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील बहुताश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस, पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवेच्या दाबात होणाऱ्या बदलामुळे पाऊस
पुढील काही दिवस वगळता हवेच्या दाबात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे राज्यात ऑगस्टमध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जुलै महिन्यातील पावसाच्या वितरणावर हवामान बदलाचा परिणाम झाला आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा कमी किंवा सामान्य पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात सामान्य पावसाची स्थिती
मराठवाड्यात हंगामात पहिल्यांदाच सामान्य पावसाची स्थिती नोंदली गेली आहे. गेल्या आठवड्यात या भागात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे तेथील शेतीसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मराठवाड्यात २८ जुलैपर्यंत २४२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साधारण १ जून ते २८ जुलै या कालावधीत येथे २८६.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. याचबरोबर राज्यातील सर्व चारही उपविभांगांमध्ये पावसाची सामान्य स्थिती आहे.
मुंबईत पाऊस कसा असेल
मुंबईत मंगळवारी अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मागील काही दिवसांत झालेल्या पावसाप्रमाणे पाऊस पडणार नाही. मुंबईत बुधवपारपासून पावसाचे प्रमाण काहीसे कमी होईल.