मुंबई: राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरुन जनता हैराण झाली असतानाच नांदेड जिल्ह्यातील उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ८३ तसेच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पेढी नदीवरील पूल आणि वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तीर्थक्षेत्रातील संत सेवालाल मंदीराची इमारत राज्यातील सर्वोत्कृष्ट असल्याची घोषणा राज्य सरकारने गुरुवारी केली. लवकरच एका कार्यक्रमात या वास्तूंची उभारणी करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सन्मान केला जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती, पुलांची संकल्पना तयार करुन तसेच इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनवताना तसेच, सार्वजनिक इमारतींची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लावणाऱ्या अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरण्यासाठी अभियंता दिनाचे औचित्य साधून अशा चांगल्या अभियत्यांचा राज्यातील उत्कृष्ट रस्ता, पूल आणि शासकीय इमारतींची घोषणा करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.
नवीन संकल्पना, बांधकाम खर्चातील बचत करुन उभारण्यात आलेल्या २५ कोटी पेक्षा अधिक किंमतीच्या प्रकल्पांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. पुरस्कारांचे हे पहिले वर्ष असून आशियाई विकास बँकेच्या साह्याने नांदेड जिल्ह्यातील उमरी व धर्माबाद तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग-८३ वरील खुजडा जंक्शन ते कोरेगाव फाटा दरम्यानचा २५.६५ किमी लांबीचा मार्ग तसेच कोरेगाव फाटा ते धर्माबाद बाळापूर दरम्यानचा २७.३८ किलोमीटर लांबीचा रस्ता राज्यातील उत्कृष्ट रस्ता म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर प्रमुख राज्य मार्ग- १४ वरील पेढी नदीवरील पूलांची राज्याली उत्कृष्ट पुूल म्हणून निवड करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थक्षेत्र आराखडयाची उत्कृष्ट इमारत गटात निवड झाली आहे.