मुंबई : सातारा जिल्ह्यातील बारमाही दुष्काळी तालुका म्हणून माणची ओळख आहे. याच माणमधील राधा नावाच्या बुटक्या म्हशीने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मलवडी गावच्या त्रिबक दाजी बोराटे या शेतकऱ्याच्या गोट्यात मुऱ्हा म्हशीच्या पोटी जन्मलेल्या राधाची उंची केवळ दोन फूट आठ इंच (८९.८ सेमी) आहे. त्यामुळे माणची ही राधा ठरली आहे, जगातील कमी उंचीची पाळीव म्हैस.

त्रिबक बोराटे यांच्या गोट्यात १९ जून २०२२ रोजी राधाचा जन्म झाला. राधा दोन वर्षांची झाल्यानंतर तिची उंची इतर म्हशींसारखी वाढत नसल्याचे बोराटे यांचे कृषी पदवीधर असलेले पुत्र अनिकेत यांच्या लक्षात आले. त्यानंतर राधाला कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात. राधा पहिल्यांदा सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सहभागी झाली, त्यानंतर राधाचा बोलबाला सुरू झाला. त्यानंतर श्री सेवागिरी कृषी प्रदर्शन, पुसेगाव.

इंदापूर कृषी प्रदर्शन, संगमनेर कृषी महोत्सव, कृषी उत्सव, निपाणी (कर्नाटक) आदी कृषी प्रदर्शनांमधून पारितोषिके पटकाविली. त्यानंतर अनिकेत यांनी स्थानिक पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांच्या मदतीने सर्व कागदपत्रे तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. अखेर २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस म्हणून नोंद झाली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही राधाचा नोंद झाली आहे.

राधा गाभण जाणे शक्य नाही

उंचीचे जनुके राधामध्ये विकसीत न झाल्यामुळे राधाची उंची कमी राहिली आहे. राधाच्या आईची उंची चांगली होती. कमी उंचीमुळे राधा गाभण जाणे शक्य नाही. सामान्यपणे मुऱ्हा म्हशीची उंची पाच ते सहा फूट आणि वजन ५०० किलोच्या पुढे असते. राधाची उंची दोन फूट आठ इंच (८९.८ सेमी) आणि वजन केवळ २८५ किलो आहे, अशी माहिती पशूधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांनी दिली.

उंची वाढली नाही, पण कीर्ती वाढली!

अशी आहे राधा…

  • नाव – राधा, मुऱ्हा संकरीत.
  • उंची – दोन फूट आठ इंच (८९.८ सेमी).
  • वय – ३ वर्षे ६ महिने. वजन – २८५ किलो.
  • मालकाचे नाव- त्रिबक दाजी बोराटे. मलवडी, (ता. माण)
  • आहार – मका, कडवळ, मेथी गवत, हात्ती गवत.
  • खुराक – शेंगदाणा पेंड, मका भुस्सा, गव्हाचे पीठ