मुंबई : शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने यंदा इयत्ता पाचवी व आठवीची अखेरची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३.३० या कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवीची मराठी भाषा व गणित या विषयाची परीक्षा सकाळी ११ ते १२.३० या कालावधीत होणार आहे. तर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची परीक्षा दुपारी २ ते ३.३० या कालावधीत होणार आहे.
तसेच, इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजीच होणार असून, मराठी भाषा व गणित या विषयाची परीक्षा सकाळी ११ ते १२.३० या कालावधीत होणार आहे. तर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची परीक्षा दुपारी २ ते ३.३० या कालावधीत होणार आहे. राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनमान्य शाळांमधून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in https://puppssmsce.in या संकेतस्थळावर २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नोंदणीचे वेळापत्रक
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना २७ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह, १६ ते २३ डिसेंबरपर्यंत अति विलंब शुल्कासह आणि २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. ३१ डिसेंबरनंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाईन अशी कोणत्याही पद्धत तिने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही, असे परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षेसाठी अटी
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र राहतील. सीबीएसई, आईसीएसई आणि इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय १ जून रोजी कमाल १० वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय १३ वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षा शुल्क
बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये आणि परीक्षा शुल्क १५० रुपये असे एकूण २०० रुपये शुल्क असेल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती- विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये आणि परीक्षा शुल्क ७५ रुपये असे एकूण १२५ रुपये शुल्क असेल. याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी २०० रुपये नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल.
