Teacher Eligibility Test Timetable Announced मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणार्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी शिक्षकांना १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार असून, ही परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापन,सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शिक्षक तसेच शिक्षक सेवक पदावरील नियुक्तीसाठी ‘टीईटी’ परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. या परीक्षेशी संबंधित शासन निर्णय व सूचना, तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे आणि परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येईल. तसेच २०१८ आणि २०१९च्या ‘टीईटी’ गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांना संबंधित परीक्षेसाठी अर्ज करता येणार नसल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
यापूर्वी झालेल्या परीक्षेत ३ लाख ५३ हजार ९५२ शिक्षकांनी नोंदणी करत परीक्षा दिली. मात्र त्यापैकी फक्त ३.३८ टक्के म्हणजेच ११ हजार १६८ शिक्षक परीक्षा उत्तीर्ण झाले होते.
परीक्षेचे वेळापत्रक
– २३ नोव्हेंबरला परीक्षा
– १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर – ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची मुदत
– १० ते २३ नोव्हेंबर – प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होईल
– २३ नोव्हेंबर – सकाळी १०.३० ते १ या वेळेत पहिला पेपर
– २३ नोव्हेंबर – दुपारी २.३० ते ५ या वेळेत दुसरा पेपर